महापालिका आयुक्त, शहर अभियंत्याची बदली?
By admin | Published: April 8, 2017 01:54 AM2017-04-08T01:54:51+5:302017-04-08T01:54:51+5:30
पिंपरी-चिंचवड महापालिकेत सत्तांतर झाल्यानंतर महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांच्यासह प्रतिनियुक्तीवर आलेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या होणार
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेत सत्तांतर झाल्यानंतर महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांच्यासह प्रतिनियुक्तीवर आलेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या होणार आहेत. शासनाकडून शहर अभियंता आणण्यासाठी भाजपाच्या वतीने प्रयत्न केले जात आहेत.
राज्यात भारतीय जनता पक्षाचे सरकार आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेत सत्ता आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले. आयुक्त म्हणून दिनेश वाघमारे यांना पिंपरीत पाठविले होते. वाघमारे यांनी तत्कालीन सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या चुकीच्या कामांना चाप लावण्याचे काम केले होते. शवदाहिनी, साहित्य खरेदी, मूर्ती खरेदी प्रकरणांची चौकशी लावली होती. तसेच घरकुलातील बोगस लाभार्थींवरही गुन्हे दाखल झाले होते. महापालिका निवडणुकीत सत्तांतर झाले आहे. राष्ट्रवादीची एकमुखी सत्ता जाऊन भाजपाची सत्ता आली आहे. आयुक्तांना पदोन्नती काही महिन्यांपूर्वीच मिळाली आहे. तसेच कौटुंबिक कारणामुळे मला मुंबईत बदली द्यावी, अशी त्यांनी
शासनास विनंती केली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विश्वासातील असल्याने लवकरच त्यांची बदली होणार अशी चर्चा महापालिकेत आहे.
शासनाकडून प्रतिनियुक्तीवर आलेल्या अधिकाऱ्यांशिवाय येत्या मेमध्ये कार्यकाल संपलेल्या महापालिकेतील अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याचे संकेत आयुक्तांनी दिले आहेत. त्यामुळे प्रशासनाने बदल्यांची कार्यवाही सुरू केली आहे. अधिकारी आणि कर्मचारी यांची यादी करून वर्षांनुवर्षे ठिय्या मांडलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या बदल्या होणार आहेत. त्यामुळे राजकीय नेत्यांच्या संबंधित असणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. तर काहींनी राजकीय नेत्यांकडे आपल्या नावासाठी सेटींग सुरू केली आहे.
पक्षनेते एकनाथ पवार
म्हणाले, ‘‘महापालिकेचे शहर अभियंता हे महत्त्वाचे पद आहे. योग्य नियोजन करणाऱ्या एकनाथ उगिलेंसारख्या शहर अभियंत्यांची शहरास गरज आहे. त्यामुळे शासनाकडून शहर अभियंतापदी अधिकारी मिळावा, यासाठी प्रयत्न करणार आहे.’’(प्रतिनिधी)
>प्रतिनियुक्तीवरील अधिकाऱ्यांच्या बदलीचे संकेत
अतिरिक्त आयुक्त तानाजी शिंदे यांचा कालखंड संपला आहे. प्रतिनियुक्तीवर आलेल्या अधिकाऱ्यांचा कालखंड संपलेला आहे. निवडणूक होताच सहायक आयुक्त डॉ. यशवंत माने यांची बदली केली आहे. तसेच सहायक आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर यांना अतिरिक्त आयुक्त म्हणून पदोन्नती मिळाली आहे. त्यामुळे आष्टीकर यांचीही बदली होऊ शकते. तसेच प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांचाही कार्यकाल संपला आहे. त्यांचीही बदली होऊ शकते.