पालिकेचा सफाई कामगार बनला म्हाडा अधिकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2017 02:58 AM2017-07-20T02:58:13+5:302017-07-20T02:58:13+5:30

सकाळी हातात झाड़ू घेऊन सफाई कामगाराची जबाबदारी पाडायची. कामावरून सुट्टी होताच, सुटाबुटात म्हाडाचा अधिकारी म्हणून बाहेर पडायचे.

Municipal Corporation clears the clothes of the MHADA | पालिकेचा सफाई कामगार बनला म्हाडा अधिकारी

पालिकेचा सफाई कामगार बनला म्हाडा अधिकारी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : सकाळी हातात झाड़ू घेऊन सफाई कामगाराची जबाबदारी पाडायची. कामावरून सुट्टी होताच, सुटाबुटात म्हाडाचा अधिकारी म्हणून बाहेर पडायचे. शासकीय कोट्यातून म्हाडामध्ये स्वस्तात घर देण्याचे आमिष दाखवून, कोट्यवधीचा गंडा घालणाऱ्या पालिकेच्या सफाई कामगाराचे बिंग फोडण्यात सायन पोलिसांना यश आले आहे. राजेंद्र शंकर घाडगे (४७) असे अटक आरोपीचे नाव आहे.
गोवंडीचा रहिवासी असलेला राजेंद्र पालिकेच्या एम वॉर्डमध्ये सफाई कामगार म्हणून आहे. सकाळच्या सुमारास हातात झाड़ू घेऊन सफाई करायची. ड्युटी संपताच सूट, बूट, टाय लावून बाहेर पडायचे. मित्र, नातेवाईक यांना तो म्हाडाचा अधिकारी असल्याचे सांगत असे. त्याच्या उच्च राहणीमानामुळे कोणीही त्याच्यावर सहज विश्वास ठेवत असे. याचाच फायदा घेत, २०१५ मध्ये सायन परिसरात राहत असलेले संदीप माने यांची घाडगेसोबत ओळख झाली. माने घराच्या शोधात असल्याचे समजताच, घाडगेने त्याला म्हाडात स्वस्तात घर मिळवून देण्याचे आमिष दाखविले. शासकीय कोट्यातून ८ फ्लॅट माझ्याकडे आहेत. त्याची किंमत ४० लाख इतकी आहे. मात्र, सुरुवातीला अवघ्या ७ लाख रुपयांत तो फ्लॅट्स तुमच्या नावावर करू शकतो. उर्वरित रकमेचे कर्ज अथवा अन्य कारण देऊन ती कमी करू शकतो, याचे आमिष त्याने दाखविले.
स्वप्ननगरीत अवघ्या ७ लाखांत हक्काचे घर मिळणार, यासाठी माने यांनी पैशांची गुंतवणूक केली. त्यांनी आयुष्यभराची जमापुंजी, तसेच घरातील दागिने गहाण ठेवून ७ लाख रुपये जमा केले. घाडकेकडे पैसे दिले. पैसे देऊन दोन वर्षे उलटत आली, तरीही फ्लॅटची चावी मिळत नसल्याने, माने यांनी त्यांच्याकडे पैसे परत देण्यासाठी तगादा लावला. घाडगेने डिसेंबर २०१६ मध्ये त्यांच्याशी संपर्क तोडला. त्यांनी याबाबत सायन पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून सायन पोलिसांनी घाडगेविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.
तपास अधिकारी संतोष गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अंमलदार पंकज सोनावणे, धनराज पाटील आणि महेंद्रसिंग पाटील यांनी घाडगेचा शोध घेण्यास सुरुवात केली. या प्रकरणात मानेसह सात जणांना अशा प्रकारे गंडा घातल्याचे समोर आले. यात ६५ वर्षांच्या वृद्धाचाही समावेश आहे. त्यांनी पत्नीला हक्काच्या घरात नेण्यासाठी तिचे सोन्याचे मंगळसूत्रही विकले.
तपासात तो पालिकेच्या एम वॉर्डमध्ये सफाई कामगार म्हणून काम करत असल्याचे स्पष्ट होताच, तपास पथकाने मोर्चा पालिकेकडे वळविला. मात्र, पोलीस आल्याची माहिती मिळताच घाडगे तेथून पळ काढत असे. त्यामुळे त्याच्यापर्यंत पोहोचणे पोलिसांसमोर आव्हान होते. त्याच्या घरच्या पत्त्यावरदेखील कोणीच नव्हते. घरातली मंडळी सातारा येथे गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली. तपास सुरू असताना, मंगळवारी सायंकाळी घाडगे सायन परिसरात येणार असल्याची माहिती तपास पथकाला मिळाली. त्यानुसार, गायकवाड यांनी पथकासह सापळा रचला आणि घाडगेला बेड्या ठोकल्या.

मानखुर्दमध्ये दोन कोटींचा गंडा
म्हाडाचा फ्लॅट देण्याचे आमिष दाखवून २ कोटींचा गंडा घातल्याप्रकरणी बुधवारी मानखुर्द पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. कुर्ला न्यायालयाच्या आदेशाने मानखुर्द पोलिसांनी बन्सीलाल गुप्ता, सचिन सिद्धू, रजनीत सिद्धू, किरण सिद्धू यांच्याविरुद्ध हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या चौकडीसह त्यांचे नातेवाईक आणि अन्य साथीदारांनी म्हाडामध्ये
घर देण्याच्या नावाखाली तक्रारदार बलराम शिरसाठे यांच्याकडून २
कोटी १० लाख रुपये उकळले. त्यांना घरासंबंधीचे खोटे भोगवटापत्रही दिले होते.

शिवडीत २८
लाखांची फसवणूक
म्हाडाचे घर मिळवून देतो, म्हणून शिवडीत नानोसे निवत्ती इंगळे (४५) यांच्याकडून डिसेंबर २०१४ पासून तब्बल २८ लाख रुपये उकळण्यात आले. पैसे देऊनही फ्लॅटचा ताबा मिळत नसल्याने, इंगळेंनी मंगळवारी रफिक अहमद किडवाई मार्ग पोलिसांकडे फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणातही घाडगेचा काही सहभाग आहे का? या दिशेनेही तपास सुरू आहे.

तुमचीही फसवणूक झालीय का?
घाडगेने अशा प्रकारे अनेकांना गंडा घातला आहे. त्यामुळे घाडगेच्या जाळ्यात अडकून फसवणूक झाली असल्यास पोलिसांशी संपर्क साधा, असे आवाहन सायन पोलिसांनी केले आहेत.

Web Title: Municipal Corporation clears the clothes of the MHADA

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.