पालिकेची रुग्णालयेच जीवघेणी

By Admin | Published: August 24, 2016 01:00 AM2016-08-24T01:00:20+5:302016-08-24T01:00:20+5:30

पालिकेच्या दवाखान्यातच रुग्णांची योग्य ती काळजी घेतली जात नसल्याचे चित्र आहे.

Municipal corporation is life threatening | पालिकेची रुग्णालयेच जीवघेणी

पालिकेची रुग्णालयेच जीवघेणी

googlenewsNext

सायली जोशी-पटवर्धन,

पुणे- महापालिकेकडून एकीकडे आरोग्याच्या विविध मोहिमा राबविल्याचे दाखविले जात असताना, दुसरीकडे मात्र पालिकेच्या दवाखान्यातच रुग्णांची योग्य ती काळजी घेतली जात नसल्याचे चित्र आहे. पालिकेच्या गाडीखाना येथील डॉ. कोटणीस दवाखान्यात लहान मुलांचे लसीकरण आणि सर्व सांसर्गिक आजारांच्या रुग्णांचा वावर अतिशय सहज होईल, याची सोयच पालिकेने न केल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या पाहणीत समोर आले आहे.
शुक्रवार पेठेतील गाडीखाना येथील महापालिकेचे ‘डॉ. कोटणीस आरोग्य केंद्र’ हे एक प्रमुख आरोग्य केंद्र आहे. याठिकाणी त्वचा, कान-नाक, घसा, क्षयरोग यांच्यासाठी उपचार घेण्यासाठीही मोठ्या प्रमाणात गर्दी असते. कोणत्याही आजाराचे निदान करण्यासाठी रुग्ण आरोग्य केंद्रात आल्यास, त्याचा केसपेपर काढण्याची सोय या विभागाच्या बाहेरच्याच बाजूला होती; मात्र आता कोणतेही कारण न देता केसपेपर काढण्याची सुविधा अचानक हलवून याच आरोग्य केंद्राच्या आवारात असणाऱ्या काची प्रसूतिगृह येथे करण्यात आली आहे.
काची रुग्णालयात प्रसूतीसाठी महिलांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. याबरोबरच मंगळवार व शुक्रवार या दिवशी बालकांचे लसीकरणही केले जाते. याच ठिकाणी ताप, सर्दी यांसारख्या आरोग्याच्या इतर तक्रारींसाठीही काची रुग्णालयाचा वापर केला जातो. केसपेपर काढण्याची सोय अचानक काची रुग्णालयात करण्यात आल्याने रुग्णांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत असल्याचे दिसून आले.
इतकेच नाही, तर याठिकाणी मंगळवारी लसीकरणासाठीही बालकांची मोठी गर्दी होती. क्षयरोगासारख्या गंभीर आजारांचे रुग्ण बालकांच्या आसपास केसपेपर काढण्यासाठी येत असल्याने एकीकडे आजारांपासून दूर राहावे यासाठी लसीकरण आणि दुसरीकडे संसर्गरोग असणाऱ्या रुग्णांचा बालकांच्या जवळ असणारा वावर, असे गंभीर चित्र पाहायला मिळाले.
या आरोग्य केंद्रात रुग्णांची केवळ तपासणीच नाही, तर पॅथ लॅबमध्ये विविध तपासण्या याठिकाणी केल्या जातात. तपासण्यांद्वारे योग्य ते निदान केल्यावर औषधोपचारही करण्यात येतात. यासाठी वेगवेगळे विभागही करण्यात आले असून, आरोग्य केंद्राच्या तळमजल्यावर क्षयरोग विभाग असून, दुसऱ्या मजल्यावर एचआयव्ही विभाग आहे, तर तिसऱ्या मजल्यावर त्वचारोग आणि कुत्रा चावल्याची तपासणी केली जाते.
>अचानक बदलाने रुग्णांना त्रास
डॉ. कोटणीस आरोग्य केंद्रात विविध आजारांसाठी येणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांची संख्या मोठी आहे. पूर्वी केसपेपर काढून त्याच ठिकाणी डॉक्टरांकडे तपासणी आणि औषधे दिली जायची.
मात्र, आता केसपेपर रुग्णालयात जावे लागत आहे. सर्व विभागांचे केसपेपर एकाच ठिकाणी मिळत असल्याने याठिकाणी रुग्णांची गर्दी होत असल्याचे चित्र आहे.
हा केसपेपर घेऊन पुन्हा डॉक्टरांकडे तपासणीसाठी जायचे. डॉक्टरांनी तपासणी करायला सांगितल्यास, समोरील इमारतीच्या लॅबमध्ये तपासणीसाठी जावे लागते. त्यानंतर हा अहवाल घेऊन डॉक्टरांकडे येऊन निदान आणि आणि मग पुन्हा औषधे घेण्यासाठी औषध विभागात जाणे, यामध्ये ज्येष्ठ नागरिकांची मोठ्या प्रमाणात दमछाक होत असल्याचे चित्र आहे.प्रसूती झालेल्या महिला, बालके; तसेच इतर आजारांच्या केसपेपरसाठी येणारे ज्येष्ठ रुग्ण यांची कोटणीस दवाखान्यात मोठी संख्या असते. ज्येष्ठ नागरिक, बालके आणि प्रसूती झालेल्या महिला यांची प्रतिकारशक्ती कमी असल्याने त्यांना कोणत्याही आजाराची लागण होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात असते. अशावेळी केसपेपरचे ठिकाण अचानक का बदलण्यात आले, असा प्रश्न निर्माण झाला आहे. लहान मुले किंवा गर्भवती महिलांना कोणत्याही संसर्गजन्य आजाराची लागण झाली, तर त्याला जबाबदार कोण?
>ज्येष्ठांची गैरसोय : निष्कारण वणवण
खडकवासला, विश्रांतवाडी, वानवडी यांसारख्या शहराच्या उपनगरांतून आलेल्या ज्येष्ठ नागरिकांनी ‘लोकमत’शी बोलताना आपली समस्या बोलून दाखविली. त्वचेच्या समस्येसाठी उपचार घेणारे ७० वर्षांचे रुग्ण शिंदे म्हणाले की, मी मागील २ वर्षांपासून याठिकाणी उपचार घेत आहे; मात्र आरोग्यव्यवस्थेमध्ये अचानक बदल केल्याने ज्येष्ठांना त्रास होतो.७० वर्षांहून अधिक वय असलेल्या खडकवासल्याहून आलेल्या एका ज्येष्ठ महिलेनेही यंत्रणेमध्ये बदल करण्यात आल्याने इकडून तिकडे जाण्यात बराच वेळ; तसेच शक्ती वाया जात असल्याचे सांगितले.

Web Title: Municipal corporation is life threatening

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.