एक गाव एक गणपतीसाठी महापालिकेने पुढाकार घ्यावा
By admin | Published: July 22, 2016 02:25 AM2016-07-22T02:25:05+5:302016-07-22T02:25:05+5:30
गणपती विसर्जनासाठी कृत्रिम तलावाची संकल्पना राबवण्याच्या प्रयत्नात असलेल्या महापालिकेने आता एक गांव एक गणपतीसाठीही पुढाकार घ्यावा
वसई : गणपती विसर्जनासाठी कृत्रिम तलावाची संकल्पना राबवण्याच्या प्रयत्नात असलेल्या महापालिकेने आता एक गांव एक गणपतीसाठीही पुढाकार घ्यावा असे आवाहन जिल्हा परिषदेचे माजी वैद्यकिय अधिकारी तथा महापालिकेने उत्कृष्ट डॉक्टर म्हणून गौरवलेले डॉ.जी.पी.मेन यांनी केले आहे.
वसई तालुक्याची लोकसंख्या झपाट्याने वाढत चालली आहे. मुंबई व आसपासच्या शहरातील लोक आपल्या स्वप्नातील घर म्हणून वसईकडे वळू लागली आहेत. घर मिळवल्यानंतर नवस फेडण्यासाठी गणेशाची स्थापना करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे.गणेशाच्या प्लॅस्टर आॅफ पॅरिसच्या मूर्त्यां तलावात विसर्जीत करण्यात येत असल्यामुळे तलावे दूषित होत चालले आहेत. पूर्वी ज्या तलावांतील पाणी मोठ्या प्रमाणात वापरले जात होते.त्या पाण्याला आता दुर्गंधी सुटू लागली आहे. त्यामुळे विसर्जनासाठी कृत्रिम तलाव बनवण्याची महापालिकेने ठरवलेली योजना चांगली आहे.या योजनेमुळे तलाव दूषित होणार नाहीत.आणि नागरिकांच्या धार्मीक भावनाही दुखावल्या जाणार नाहीत. अशा शब्दात डॉ.मेन यांनी महापालिकेच्या या योजनेचे स्वागत केले आहे.
या योजनेबरोबरच महापालिकेने आता एक गांव एक गणपतीसाठी पुढाकार घ्यावा. त्यामुळे गणपतींची संख्या कमी होईल. गावांगावात दुरावा कमी होवून एकोपा निर्माण होईल.या उत्सवात खर्च कमी आणि उत्साह द्विगुणीत होईल. पोलीस आणि शासकिय कर्मचाऱ्यांचा ताण कमी होईल. असा विश्वास डॉ.मेन यांनी व्यक्त केला आहे. (प्रतिनिधी)