फेब्रुवारीत महापालिकांचा फड
By admin | Published: January 9, 2017 05:30 AM2017-01-09T05:30:18+5:302017-01-09T05:30:18+5:30
मार्च-एप्रिल महिन्यात मुदत संपणाऱ्या अकरा महापालिकांची निवडणूक फेब्रुवारीतच होणार असून, आयोगाने सर्व तयारी पूर्ण केली आहे
मुंबई : मार्च-एप्रिल महिन्यात मुदत संपणाऱ्या अकरा महापालिकांची निवडणूक फेब्रुवारीतच होणार असून, आयोगाने सर्व तयारी पूर्ण केली आहे, अशी माहिती मुख्य निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
मुंबईसह ठाणे, पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक, सोलापूर, नागपूर, अमरावती आणि अकोला या महापालिकांची मुदत मार्चमध्ये, तर उल्हासनगर व चंद्रपूर या महापालिकांची मुदत एप्रिलमध्ये संपत आहे. मुदत संपण्याच्या तारखेच्या सहा महिन्यांपर्यंत आधी निवडणूक घेता येते. त्यामुळे या ११ मनपांची मार्चमध्ये निवडणूक अपेक्षित होती. परंतु मार्चमध्ये दहावी आणि बारावीच्या परीक्षा असल्याने निवडणुका फेब्रुवारीत घेण्यात येणार असल्याचे सहारिया यांनी सांगितले. (विशेष प्रतिनिधी)
जिल्हा परिषदांचे काय?
रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, नाशिक, जळगाव, अहमदनगर, अमरावती, बुलडाणा, यवतमाळ, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, बीड, नांदेड, उस्मानाबाद, लातूर, नागपूर,
वर्धा, चंद्रपूर व गडचिरोली अशा २६ जिल्हा परिषदांची मुदत देखील मार्चमध्येच संपत आहे.
ठाणे जिल्ह्याच्या विभाजनानंतर स्थापन झालेल्या पालघरच्या स्वतंत्र जिल्हा परिषदेची पहिली निवडणूकही याच वर्षाच्या पहिल्या तिमाहीत घेतली जाणे गरजेचे आहे. या निवडणुका कधी घोषित होतात, याकडेही लक्ष लागले आहे.
मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड, उल्हासनगर, नाशिक, ठाणे, नागपूर, चंद्रपूर, अकोला, अमरावती, सोलापूर या
११ शहरांमध्ये निवडणुकीचा धुव्वा उडेल.
मुंबईसह ठाणे, नाशिक, पुणे, पिंपरी-चिंचवड व नागपूर या पाच महापालिकांमध्ये भाजप-शिवसेना या सत्ताधारी पक्षांसह कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. अनेक वर्षे सेनेच्या ताब्यात असलेल्या मुंबई महापालिकेत काय घडणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष असणार आहे. मुंबईत भाजप-शिवसेना स्वतंत्र लढण्याच्या तयारीत असून युती होण्याची शक्यता जवळपास संपुष्टात आली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ‘होम टाऊन’ असलेली नागपूर महापालिका, राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आणि अजित पवार यांचा बालेकिल्ला समजला जाणारे पुणे आणि पिंपरी-चिंचवड तर मनसे
प्रमुख राज ठाकरे यांची सत्ता असलेल्या नाशिकमध्ये काय घडते, यावरच राज्यातील राजकारणाची पुढची दिशा स्पष्ट होईल.
महापालिका निवडणुकांसंदर्भात निवडणूक आयोगाने सर्व तयारी पूर्ण केली असून महापालिका आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना त्या संबंधी सूचित करण्यात आले आहे. येत्या आठवड्यात या निवडणुकांची अधिकृत घोषणा होईल.
- जे. एस. सहारिया, निवडणूक आयुक्त