नगराध्यक्षांचे नोटशीटवरील सह्यांचे अधिकारही काढले
By admin | Published: August 28, 2015 11:53 PM2015-08-28T23:53:18+5:302015-08-28T23:53:18+5:30
नगराध्यक्ष केवळ मानाचे पद ; उरला केवळ ठरावाचा अधिकार!
किशोर खैरे/ नांदुरा (बुलडाणा): नगरपालिका व नगरपंचायतच्या अध्यक्षांचे आर्थिक व्यवहाराचे महत्वाचे अधिकार काँग्रेस सरकारने आधीच काढून घेतले होते. महायुतीच्या सरकारने यात भर टाकून, नगराध्यक्षांना असलेले नोटशीटवर सह्या करण्याचे अधिकारही कमी केले आहेत. हे दोन्ही अधिकार कमी केल्याने, नगराध्यक्षांचा प्रशासनातील थेट हस्तक्षेप कमी झाला असून, हे पद आता केवळ मानाचेच उरले आहे. नगरपरिषदेत कोणतेही कामकाज नोटशीटवर चालते. एखादा ठराव घेणे, कामाला मंजूरात देणे, कार्योत्तर मंजूरात देणे, देयेक मंजूर करणे आदींबाबत संबंधित विभागाकडून नोटशीट तयार केली जाते. त्यावर खातेप्रमुखासोबत मुख्याधिकारी व नगराध्यक्षांची सही होऊन नंतर कारवाई केली जाते; मात्र आता नगराध्यक्षांना नोटशीटवर सही करण्याचे अधिकारच ठेवलेले नाहीत. महायुतीच्या सरकारने नगरपालिका व नगरपंचायतीमधील राजकीय हस्तक्षेप कमी करण्यासाठी अधिनियम १६६५ मध्ये सुधारणा करून नगराध्यक्षाचे नोटशीटवरील सह्या करण्याचे काढून घेतले आहेत. १४ ऑगस्ट रोजी राजपत्रात याबाबतची सुधारणा प्रसिध्द करण्यात आली आहे. आता नगराध्यक्ष व नगरसेवकांच्या हाती केवळ ठराव घेणे, एवढेच राहिले आहे. धनादेशावरील सह्याच्या अधिकारातील पळवाटही बंद नगरपालिकेमध्ये नगराध्यक्षांचा प्रशासकीय हस्तक्षेप व महत्व कमी करण्याचा प्रयत्न धनादेशावरील सही करण्याचा आदेश रद्द करून करण्यात आला; मात्र नोटशीटवर सह्यांचे अधिकार अबाधित होते. नोटशीटवर सही झाल्याशिवाय धनादेशच तयार केला जात नसल्याने, ज्याच्या नोटशीटवर सही करत, त्याचाच धनादेश मुख्याधिकारी व लेखापालाकडे सहीसाठी जात असे. त्यामुळे धनादेशावरील सह्यांचे अधिकार काढल्याने नगराध्यक्षांवर कोणताही परिणाम झाला नव्हता, कारण नोटशीटचा पर्याय त्यांना होता. आता मात्र हा पर्यायही संपला आहे.