नोटाबंदीमुळे महापालिकांची चांदी
By admin | Published: November 14, 2016 05:01 AM2016-11-14T05:01:27+5:302016-11-14T05:01:27+5:30
केंद्र सरकारच्या नोटाबंदीमुळे राज्यातील महापालिकांची मात्र चांदी झाल्याचे चित्र आहे. केंद्र सरकारने ५०० आणि १०००च्या नोटा बंद केल्या असल्या तरी वीज
मुंबई : केंद्र सरकारच्या नोटाबंदीमुळे राज्यातील महापालिकांची मात्र चांदी झाल्याचे चित्र आहे. केंद्र सरकारने ५०० आणि १०००च्या नोटा बंद केल्या असल्या तरी वीज, पाणी, मालमत्ता करासह शासकीय देयकांसाठी जुन्या नोटांचा वापर करण्याची सवलत दिली होती. नागरिकांनी या सवलतीचा पुरेपूर लाभ घेतला असून, विविध महापालिकांमध्ये दोन दिवसांत ३४० कोटींचा करभरणा झाला आहे. आज (सोमवार) या सवलतीचा शेवटचा दिवस असून, हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.
पाचशे आणि एक हजारच्या जुन्या नोटांद्वारे करभरणा करण्यात नागरिकांची अडचण होऊ नये यासाठी कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. रविवारी सकाळी ८ ते रात्री ८पर्यंत सर्व महापालिका, नगरपालिका कार्यालये सुरू होती. सोमवारी, १४ नोव्हेंबर रोजी गुरुनानक जयंतीची सुट्टी असली तरी सकाळी ८ ते रात्री १२ वाजेपर्यंत सर्व महापालिका व नगरपालिका कार्यालयांमध्ये कर स्वीकारण्याची सोय करण्यात आल्याचे नगरविकास विभागाकडून कळविण्यात आले आहे. जुन्या नोटांनी करभरणा करण्याची सुविधा देण्यात आल्याने गेल्या तीन दिवसांपासून दिवसभर राज्यातील सर्व महापालिका, नगरपालिकांच्या कार्यालयांत विविध करांचा भरणा करण्यासाठी लोकांनी एकच गर्दी केली आहे. आतापर्यंत ३३९ कोटी ५७ लाखांचा कर विविध महापालिकांच्या तिजोरीत जमा झाला आहे. १२ नोव्हेंबरपर्यंत महापालिकानिहाय जमा झालेली रक्कम पुढीलप्रमाणे: -
मुंबई (४३ कोटी ७ लाख), नवी मुंबई (१७ कोटी १६ लाख), कल्याण-डोंबिवली (२२ कोटी ४४ लाख), मीरा-भार्इंदर (११ कोटी ४९ लाख), वसई- विरार (५ कोटी ९८ लाख), उल्हासनगर (१७ कोटी ८ लाख), पनवेल (१३ कोटी २ लाख), भिवंडी-निजामपूर (७ कोटी ६९ लाख), पुणे (४१ कोटी ६७ लाख), पिंपरी-चिंचवड (१५ कोटी ८२ लाख), ठाणे (१४ कोटी ५० लाख), सांगली-कुपवाड (५ कोटी ९२ लाख), कोल्हापूर (३ कोटी ४२ लाख), अहमदनगर (४ कोटी ६ लाख), नाशिक (११ कोटी ७ लाख), धुळे (५ कोटी ४० लाख), जळगाव (५ कोटी ७ लाख), मालेगाव (३ कोटी ८५ लाख), सोलापूर ( ९ कोटी ३५ लाख), औरंगाबाद (४ कोटी ४२ लाख), नांदेड-वाघाळा (५ कोटी १८ लाख), अकोला (१ कोटी ६५ लाख), अमरावती (४ कोटी ४६ लाख), नागपूर (९ कोटी ९० लाख), परभणी (२४ कोटी), लातूर (३ कोटी १२ लाख), चंद्रपूर (१ कोटी ४७ लाख) याशिवाय राज्यातील सर्व नगरपालिकांमध्ये ६२ कोटी ९५ लाखांचा करभरणा झाला आहे. (प्रतिनिधी)