नगरपरिषद निवडणूक होणार रंगतदार

By Admin | Published: October 8, 2016 02:18 AM2016-10-08T02:18:53+5:302016-10-08T02:18:53+5:30

बऱ्याच कालावधीपासून नगराध्यक्ष आरक्षण काय येणार याची राजकीय वर्तुळात उत्कंठा होती.

Municipal council elections will be colorful | नगरपरिषद निवडणूक होणार रंगतदार

नगरपरिषद निवडणूक होणार रंगतदार

googlenewsNext


रोहा : बऱ्याच कालावधीपासून नगराध्यक्ष आरक्षण काय येणार याची राजकीय वर्तुळात उत्कंठा होती. अखेर नगराध्यक्ष पदाची आरक्षण सोडत जाहीर होऊन रोहा नगरपरिषदेसाठी सर्वसाधारण आरक्षण जाहीर झाले. सर्वसाधारण आरक्षण जाहीर झाल्याने अनेक इच्छुक नगराध्यक्ष पदाच्या शर्यतीत उतरणार असल्याने रोहा नगरपरिषदेची निवडणूक रंगतदार होण्याची चिन्हे दिसून येत आहेत. रोह्यातील सत्ताधारी राष्ट्रवादीची या निवडणुकीत स्थानिक पातळीवर काँग्रेसबरोबर युती होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या युतीमुळे धर्मनिरपेक्ष पक्षांची एकत्रित आघाडी विरुद्ध सेना-भाजपा-आरपीआय अशी आघाडी होऊ शकते.
निवडणुका आल्या की, रोह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागते. यावेळी सर्वसाधारण गटासाठी आरक्षण जाहीर झाल्याने व मागील वेळी महिला नगराध्यक्षांचे आरक्षण राहिल्याने यंदा महिला उमेदवारांना कोणत्याही पक्षाकडून नगराध्यक्ष पदासाठी संधी मिळणे अवघड दिसून येत आहे. लोकसभा, विधानसभा निवडणुकांमध्ये केंद्रात व राज्यात सत्तेमध्ये असूनही राष्ट्रवादी पक्षाला अपेक्षित यश मिळू शकले नव्हते. तत्कालीन नगराध्यक्ष व श्रीवर्धनचे आमदार अवधूत तटकरे यांच्यावरील नाराजीचा फटका राष्ट्रवादीला बसल्याचे बोलले जात होते. अखेर निवडणूक निकालांचे आत्मचिंतन करून अवधूत तटकरे यांना रोह्याच्या नगराध्यक्ष पदाचा राजीनामा देण्यास सांगण्यात आले. त्यानंतर विरोधी नगरसेवकांनी केलेल्या सहकार्यामुळे आणि जनतेचा पक्षावरील रोष कमी होण्यासाठी समीर शेडगे यांच्या गळ्यात नगराध्यक्ष पदाची माळ राष्ट्रवादीकडून घालण्यात आली. सुरुवातीच्या काळात नगराध्यक्ष पदाची माळ तीन महिन्यांसाठी असल्याचे सांगण्यात येत होते. परंतु नगराध्यक्ष समीर शेडगे यांनी विरोधी नगरसेवकांना हाताशी धरून मागील वर्षभरात चांगल्या प्रकारे बस्तान बसवून जनतेच्या कामांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. याचा फायदा नगरपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादीला होण्याची चिन्हे आहेत. परंतु यावेळी जनतेमधून थेट नगराध्यक्ष निवडीची प्रक्रि या होणार असल्याने राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा सुनील तटकरे यांना नगराध्यक्ष पदासाठीचा उमेदवार जाहीर करताना अनेक इच्छुकांना शांत करावे लागणार आहे. राष्ट्रवादीकडून तटकरे कु टुंबीयाबाहेरचा उमेदवार नगराध्यक्ष म्हणून असणार का? याबाबत देखील तर्कवितर्कलढविले जात आहेत.
शिवसेना ,भाजपा व आरपीआय अशी महायुती झाल्यास नगराध्यक्ष पदाचा उमेदवार सेनेचा की भाजपाचा याबाबत देखील उत्सुकता आहे. शहरामध्ये भाजपापेक्षा शिवसेनेचे पारडे निश्चितच जड आहे, परंतु नगराध्यक्ष पदाची निवड थेट जनतेमधून होणार असल्याने शिवसेना व भाजपा यांच्यातील इच्छुक उमेदवारांपैकी एका उमेदवारावर सेना, भाजपा व आरपीआय यांचे एकमत होणे आवश्यक आहे. राजकीय महत्त्वाकांक्षा असणारे कार्यकर्ते राष्ट्रवादी ,काँग्रेस , शिवसेना, शेकाप, आरपीआय, भाजपा, मनसे सर्वच पक्षांमध्ये आहेत.
एकंदरीतच जसा निवडणुकीचा दिवस जवळ येईल रोहा नगरपरिषदेच्या निवडणुकीत अनेक रंग पहावयास मिळतील हे निश्चित आहे.
>माथेरानमध्ये चौरंगी लढत?
माथेरान : राजकीय वर्तुळात मागील अनेक दिवसांपासून सुरू असलेली नगराध्यक्ष आरक्षणाबाबतची प्रतीक्षा संपलेली असून येथे सर्वसाधारण महिला गटासाठी थेट निवडणूक पद्धतीत आरक्षित झाल्याने सर्वच इच्छुक उमेदवारांचा हिरमोड झाला आहे. तरीसुद्धा ही निवडणूक येथील प्रमुख पक्षांसाठी प्रतिष्ठेचा विषय बनली आहे. सध्यातरी येथे शिवसेनेने विविध कामांचा सपाटा सुरू ठेवल्यामुळे त्यांचे प्राबल्य दिसत आहे. काँग्रेस मागील महत्त्वपूर्ण कामांच्या निकषांवर उमेदवार देणार आहे.राष्ट्रवादीने सत्ता उपभोगलेली आहे. त्यांनी आपल्याच दोन नगरसेविकांना नगराध्यक्ष पदाचा बहुमान दिलेला आहे. तर शिवसेनेतून एकंदर दोन नगरसेविकांनी मागील काळात उपनगराध्यक्ष पदांपर्यंत मजल मारलेली आहे. एकूण १७ जागांपैकी ९ जागा महिलांसाठी आहेत. त्यामुळे प्रत्येक पक्ष प्रमुख आपापले महिला उमेदवार निवडून आणण्यासाठी आटोकाट प्रयत्न करणार असल्याने ही निवडणूक सर्वच प्रमुख पक्षांना आव्हान पेलण्यासारखीच आहे.

Web Title: Municipal council elections will be colorful

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.