नवीन वर्षात वाजणार महापालिका निवडणुकीचे पडघम?; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे संकेत
By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2022 11:35 AM2022-10-26T11:35:57+5:302022-10-26T11:36:29+5:30
मुंबई महापालिकेत गेल्या २५ वर्षापासून शिवसेनेची एकहाती सत्ता आहे. या सत्तेला सुरुंग लावण्यासाठी भाजपा सज्ज आहे.
मुंबई - गेल्या २ वर्षापासून कोरोनामुळे राज्यातील महापालिका निवडणुका रखडल्या आहेत. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, औरंगाबाद यांच्यासह अनेक प्रमुख महापालिकांचा यात समावेश आहे. या निवडणुका कधी होणार असा प्रश्नच सगळ्यांना पडला आहे. त्यात दिवाळीनिमित्त अनौपचारिक गप्पांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी निवडणुकांबाबतचे संकेत दिले आहेत. त्यामुळे नवीन वर्षात राज्यात निवडणुकांचे पडघम वाजण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
महापालिका निवडणुका कधी लागणार असा प्रश्न पत्रकारांनी मुख्यमंत्र्यांना विचारला त्यावर कदाचित जानेवारी महिन्यात निवडणुका लागण्याची शक्यता आहे असं त्यांनी म्हटलं. मात्र हाच प्रश्न उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना विचारला असता निवडणुका कधी हे न्यायव्यवस्था आणि ईश्वरालाच ठाऊक असं सांगितले होते. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वेध अनेकांना लागले आहे.
महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन अनेक इच्छुक उमेदवारांनी आतापासून मोर्चेबांधणी केली आहे. यंदाची निवडणूक ही विधानसभा निवडणुकीची चाचणी असणार आहे. राज्यात सत्तांतर झाल्यापासून थेट निवडणुका होण्याची ही पहिलीच वेळ असेल. अंधेरी पोटनिवडणुकीच्या निमित्ताने भाजपा-शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे पक्ष आमनेसामने आले होते. परंतु या निवडणुकीत भाजपानं उमेदवारी मागे घेतली. त्यामुळे ऋतुजा लटके यांच्या विजयाचा मार्ग सुकर झाला आहे.
मुंबई महापालिकेत गेल्या २५ वर्षापासून शिवसेनेची एकहाती सत्ता आहे. या सत्तेला सुरुंग लावण्यासाठी भाजपा सज्ज आहे. कुठल्याही परिस्थितीत मुंबई महापालिका जिंकायची असा चंग भाजपा नेत्यांनी बांधला आहे. त्यात यंदाची निवडणूक शिवसेनेसाठी डोईजड जाणार आहे. कारण बाळासाहेबांच्या निधनानंतर पहिल्यांदाच मोठे बंड शिवसेनेत झाले आहे. त्यात बाळासाहेबांचे विचार आम्ही पुढे घेऊन जाऊ म्हणत एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदार, १२ खासदारांनी उद्धव ठाकरेंविरोधात बंड पुकारलं. त्यामुळे शिवसेनेत सध्या २ गट पडले आहेत. त्यात निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह वापरण्याची परवानगी कुणाला दिली नाही. शिवसेनेत सध्या शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि बाळासाहेबांची शिवसेना असे २ गट तयार झालेत. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत शिवसेनेचे २ गट समोरासमोर येणार असून त्यात लोकांचा कौल कुठल्या सेनेकडे असेल हे पाहणे गरजेचे आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"