महापालिका कर्मचाऱ्यांची दिवाळी अंधारात
By admin | Published: October 22, 2014 06:02 AM2014-10-22T06:02:20+5:302014-10-22T06:02:20+5:30
विधानसभा निवडणुकीमुळे पालिकेच्या आर्थिक उत्पन्नावर पुन्हा परिणाम झाला आहे. त्याचे परिणाम आता पालिका कर्मचा-यांना भोगावे लागणार आहे.
ठाणे : विधानसभा निवडणुकीमुळे पालिकेच्या आर्थिक उत्पन्नावर पुन्हा परिणाम झाला आहे. त्याचे परिणाम आता पालिका कर्मचा-यांना भोगावे लागणार आहे. दिवाळीच्या १० ते १५ दिवस आधी मिळणारे सानुग्रह अनुदान दिवाळी सुरू झाल्यानंतरही पालिका कर्मचाऱ्यांच्या हातीच पडलेले नाही. त्यामुळे त्यांची दिवाळी अंधारात जाण्याची वेळ आली आहे़ कारण दिवाळीनंतरच त्यांना सानुग्रह अनुदानाचे वाटप केले जाणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे.
विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून तत्कालीन महापौर हरिश्चंद्र पाटील यांनी पालिका कर्मचाऱ्यांना १२ हजार ५०० रुपये सानुग्रह अनुदान दिले जाईल, अशी घोषणा केली होती. परंतु, पालिकेच्या तिजोरीत पैसा नसतानाही तत्कालीन महापौरांनी अशा प्रकारे घोषणा केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात होते. केवळ विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागेल म्हणून घाई घाईनेच ही घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर काही दिवसांतच विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागली. पालिकेचा सुमारे ८० टक्के कर्मचारी हे निवडणूक कामाला लागले. त्याचा परिणाम पालिकेच्या एकूण उत्पन्नावर सुध्दा झाला असून, एलबीटीची वसुली सुध्दा रोडावली आहे. तसेच मालमत्ता, पाणीपट्टीच्या वसुलीवर देखील परिणाम झाल्याचे स्पष्ट झाले आहे. मागील महिन्यांतच पालिकेच्या तिजोरीत कर्मचाऱ्यांचा पगार निघेल, एवढी रक्कम होती. सध्या पालिकेने पुन्हा ठेकेदारांची बिले सुद्धा देण्यास विलंब केला आहे.
दरम्यान, पालिकेत आजच्या घडीला सुमारे ७,५०० कर्मचारी असून कंत्राटी कर्मचाऱ्यांची संख्या ही २,२०० च्या आसपास आहे. तसेच परिवहन सेवेच्या कर्मचाऱ्यांची संख्या ही २,५०० च्या आसपास आहे. तर शिक्षण मंडळातील कर्मचाऱ्यांची संख्या ही १,२०० च्या जवळपास आहे. या सर्वच कर्मचाऱ्यांना दरवर्षी दिवाळीच्या १५ ते २० दिवस आधी सानुग्रह अनुदान हाती पडते. पालिका कर्मचाऱ्यांना १२ हजाार ५०० आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांना सुमारे ६,५०० सानुग्रह अनुदान घोषीत केले आहे. या पोटी पालिकेच्या तिजोरीवर सुमारे १५ कोटींचा बोजा पडणार आहे. असे असले तरी दिवाळीपूर्वी पालिका कर्मचाऱ्यांची हाती सानुग्रह अनुदान दिले जाईल, असा दावा पालिकेने केला होता. परंतु आता दिवाळी सुरू झाली तरी सुध्दा अद्यापही त्यांच्या हाती सानुग्रह अनुदान न पडल्याने ते हवालदिल झाले आहेत.
यामुळे त्यांचे दिवाळीपूर्वीचे नियोजन पुरते कोलडले आहे. दिवाळीच्या खरेदीबरोबर बच्चेकंपनीला सुटीच्या दिवसांत बाहेर फिरायला कसे घेऊन जायचे याचेही नियोजन कोलमडले असल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.
सानुग्रह अनुदानविषयी विचारणा केली असता आज देऊ, उद्या देऊ असे उत्तर कर्मचाऱ्यांना मिळत आहे. या संदर्भात पालिका अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले, की दिवाळीनंतरच किंबहुना येत्या
दोन दिवसांत कर्मचाऱ्यांच्या हाती सानुग्रह पडले, असे पालिकेने स्पष्ट केले आहे. (प्रतिनिधी)