मुंबई मॅरेथॉन अडचणीत, आयोजकांना मनपाची नोटीस
By Admin | Published: January 13, 2017 06:55 PM2017-01-13T18:55:30+5:302017-01-13T18:55:30+5:30
मुंबई मॅरेथॉनच्या आयोजकांनी 5 कोटी रुपये तात्काळ न भरल्यास कोर्टात खेचण्याचा आयुक्तांनी इशारा दिला आहे.
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 13 - 'स्टँडर्ड चार्टर्ड मुंबई मॅराथॉन २०१७' रविवारी १५ जानेवारी २०१७ रोजी आयोजित करण्याचे प्रस्तावित आहे. या मॅरेथॉनच्या मार्गावर संबंधित आयोजकांद्वारे बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रात अनेक जाहिरात फलक लावण्यासह 'लेझर शो'देखील आयोजित केला जाणार आहे.
यानुसार जाहिरात शुल्क, भू - वापर शुल्क आणि सुरक्षा ठेव याकरिता रुपये ५ कोटी ४८ लाख ३० हजार ६४३ एवढी रक्कम महापालिकेकडे जमा करणे आवश्यक आहे. ही रक्कम भरण्याबाबतचे पत्र महापालिकेच्या अनुज्ञापन अधीक्षक यांच्याद्वारे यापूर्वीच आयोजकांना देण्यात आले होते.
मात्र संबंधित आयोजकांनी सदर रक्कम न भरल्याने पुढील २४ तासात सदर रक्कम महापालिकेकडे भरण्याची नोटीस मॅरेथॉनचे आयोजक/ संयोजक 'मे. प्रोकॅम इंटरनॅशनल लि.' यांना महापालिकेच्या 'ए' विभागाद्वारे देण्यात आली आहे.
5 कोटी रुपये न भरल्यास संबंधित आयोजकांवर विद्रुपीकरणाबाबत तसेच अनधिकृतपणे जाहिरातबाबत कायद्यानुसार खटला दाखल केला जाईल, अशी माहिती महापालिकेच्या 'ए' विभागाचे सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांनी दिली आहे.