नगरपालिकांचा फड वर्षअखेरीस रंगणार
By admin | Published: October 18, 2016 05:59 AM2016-10-18T05:59:13+5:302016-10-18T05:59:13+5:30
महाराष्ट्राच्या नागरी भागाचा हिस्सा असलेल्या १४७ नगरपालिका आणि १८ नगर पंचायतींसाठी २७ नोव्हेंबरला मतदान होणार
मुंबई, ठाणे वगळता आचारसंहिता लागू
मुंबई : महाराष्ट्राच्या नागरी भागाचा हिस्सा असलेल्या १४७ नगरपालिका आणि १८ नगर पंचायतींसाठी २७ नोव्हेंबरला मतदान होणार असून या निवडणुकीसाठी मुंबई, ठाणे वगळता इतरत्र आजपासूनच आचारसंहिता लागू झाली आहे.
राज्यातील १९२ नगरपालिका आणि २० नगरपंचायतींसाठी तीन टप्प्यात निवडणूक होणार आहे. पहिल्या टप्प्यात १६५ शहरातील पालिकांचा समावेश असून नगराध्यक्षांची निवड थेट जनतेतून होणार असल्याने या लहान शहारांचा कौल कोणाकडे, याबाबत उत्सुकता आहे.
निवडणूक आयुक्त जे.एस.सहारिया यांनी या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. नगरपालिकांच्या अध्यक्षपदाची निवडणूक थेट जनतेतून होईल. तसेच तेथे प्रभाग पद्धत असेल. त्यामुळे एक मतदार तीन ते चार (अध्यक्षांसह) मते देईल. नगर पंचायतींमध्ये मात्र वॉर्ड पद्धतीने निवडणूक होणार असून तेथे नगरसेवकांमधून अध्यक्ष निवडण्यात येणार आहेत. एकूण ४,७५० जागांचा फैसला होणार आहे. पनवेल व नागभीड यांचे प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याने निवडणूक होणार नाही. (विशेष प्रतिनिधी)
>पुढील ८२ दिवस असतील आचारसंहितेचे
पालिका निवडणुकीसाठीची आचारसंहिता आजपासून लागू झाली. त्यामुळे राज्य सरकारला मतदारांना प्रलोभन ठरेल असे कोणतेही निर्णय घेता येणार नाहीत. पुढील ८२ दिवस आचारसंहितेचे असतील. चार किंवा त्यापेक्षा अधिक नगरपालिकांची निवडणूक असलेल्या जिल्ह्यांमध्ये संपूर्ण जिल्हाभर आचारसंहिता असेल. तीन किंवा त्यापेक्षा कमी नगरपालिकांमध्ये निवडणूक असलेल्या जिल्ह्यात केवळ त्या नगरपालिका क्षेत्रापुरतीच आचारसंहिता असेल. सर्व ठिकाणची आचारसंहिता निकालानंतर संपुष्टात येईल.
>अशी होणार निवडणूक
निवडणूक होत नगरपालिका/ उमेदवारी अर्ज मतदानाची मतमोजणी
असलेले जिल्हे नगरपंचायती भरण्याचा कालावधीतारीखतारीख
२५ जिल्हे १४७ नगरपालिका २४ ते २९ आॅक्टोबर २७ नोव्हेंबर २८ नोव्हेंबर
१८ नगरपंचायती
२ जिल्हे १४ नगरपालिका ११ ते १९ नोव्हेंबर १४ डिसेंबर १५ डिसेंबर
४ जिल्हे २० नगरपालिका
२ नगरपंचायती १९ ते २५ नोव्हेंबर १८ डिसेंबर १९ डिसेंबर
२ जिल्हे ११ नगरापलिका ९ ते १७ डिसेंबर ८ जाने. १७ ९ जानेवारी
राखीव प्रभागातून निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे; परंतु जात वैधता प्रमाणपत्र उपलब्ध नसल्यास त्यासाठी पडताळणी समितीकडे केलेल्या अर्जाची पोचपावती उमेदवारी अर्जासोबत सादर करण्याची मूभा असेल. अशा उमेदवारांना निवडून निकालाच्या दिनांकापासून सहा महिन्यांच्या आत जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे, अन्यथा त्यांची निवड पूर्वलक्षी प्रभावाने रद्द होईल.