नागरी तक्रारींवर पालिका उदासीन

By admin | Published: May 14, 2017 01:23 AM2017-05-14T01:23:43+5:302017-05-14T01:23:43+5:30

नागरिकांना भेडसावणाऱ्या दैनंदिन तक्रारींचीही वेळेत दखल घेण्यात महापालिका उदासीन असल्याचे समोर आले आहे

The municipality disappointed at the civil complaints | नागरी तक्रारींवर पालिका उदासीन

नागरी तक्रारींवर पालिका उदासीन

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : जलवाहिनी फुटली आहे, गटार वाहतेय, अतिक्रमणाचा त्रास आहे, अशा सर्वसामान्य नागरिकांना भेडसावणाऱ्या दैनंदिन तक्रारींचीही वेळेत दखल घेण्यात महापालिका उदासीन असल्याचे समोर आले आहे. मिळालेल्या आकडेवारीनुसार जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यांत मुंबईकरांकडून आलेल्या तक्रारींपैकी निम्म्यांवर अद्याप कोणतीच पावले उचलण्यात आलेली नाहीत. यामुळे स्थानिक नागरिक मात्र हैराण आहेत.
प्रजा फाउंडेशनमार्फत गेल्या महिन्यात महापालिकेच्या कारभारावर श्वेतपत्रिका प्रसिद्ध करण्यात आली होती. यामध्ये नागरी तक्रारींची दखल घेण्यात पालिका कमी पडत असल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. महिन्याभरानंतरही यात सुधारणा झालेली नाही, असे दिसून येत आहे. जानेवारी ते एप्रिल २०१७ या चार महिन्यांत महापालिकेकडे २८ हजार २०३ नागरी तक्रारी दाखल झाल्या होत्या. यापैकी जेमतेम १४ हजार तक्रारींची दखल घेऊन पालिकेने त्यावर कारवाई केली आहे.
या तक्रारींमध्ये अतिक्रमण, जलवाहिनी व मलनि:सारण वाहिनींशी संबंधित तक्रारींचा समावेश आहे. नियमानुसार पाणी, कचरा आणि सांडपाण्याशी संबंधित तक्रारींची दखल एक ते आठ दिवसांमध्ये घेणे अपेक्षित आहे. मात्र या तक्रारींचे निराकरण करण्यात पालिका सरासरी १६ दिवस लावत असल्याचे प्रजा या संस्थेने उघड केले होते. यापैकी सर्वाधिक तक्रारी अंधेरी विभागातून आल्या असून यापैकी ५३ टक्क्यांची अद्याप दखल घेतलेली नाही.
>एका दिवसाने प्रगती़़़
नागरी समस्या सोडवण्यासाठी २०१४ मध्ये सरासरी १७ दिवस लागले होते. वर्षभरात महापालिकेने यामध्ये प्रगती केली खरी, मात्र एका दिवसाचीच. २०१६मध्ये नागरी समस्या सोडविण्यासाठी सरासरी १६ दिवस लागले आहेत़
>नियम काय सांगतो?
पाणी, सांडपाणी आणि कचरा या संबंधित तक्रारींचे निराकरण १ ते ८ या दिवसांमध्ये करणे अपेक्षित आहे. मात्र पालिका सरासरी १६ दिवसांचा कालावधी लावत आहे.
187 सेवांबाबत कोणत्याही तक्रारी असल्यास नागरिक त्याबाबत पालिकेच्या अधिकाऱ्यांकडे आपले गाऱ्हाणे मांडू शकतात. यामध्ये आरोग्य, पाणी, रस्ते, कचरा यासंबंधित तक्रारींचा समावेश आहे.
2372नागरी तक्रारी अंधेरी विभागातून पालिकेकडे आल्या होत्या. यापैकी ५३ टक्के तक्रारींवर सुनावणी नाही.

Web Title: The municipality disappointed at the civil complaints

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.