पालिकेला करावी लागणार प्रतीक्षा

By admin | Published: May 6, 2017 03:28 AM2017-05-06T03:28:06+5:302017-05-06T03:28:06+5:30

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी महापौर बंगल्याजवळील जागा मिळवण्यासाठी आणखी काही काळ प्रतीक्षा

The municipality has to wait | पालिकेला करावी लागणार प्रतीक्षा

पालिकेला करावी लागणार प्रतीक्षा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी महापौर बंगल्याजवळील जागा मिळवण्यासाठी आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे. कारण महापौर बंगल्याजवळ असलेल्या केरलिया महिला समाजाची जागा ‘जैसे- थे’ ठेवण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला दिले आहेत.
महापौर बंगल्याजवळ केरलिया महिला समाजाची जागा आहे. ही जागा महापालिकेनेच त्यांना भाडेतत्वावर दिली आहे. मात्र १९५७ पासून ही जागा महिला समाजाच्याच ताब्यात आहे. या जागेवर अनेक महिलांसाठी अनेक उपक्रम राबविण्यात येतात. परंतु, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी महापालिकेला ही जागा ताब्यात घ्यायची आहे. त्यामुळे गेल्यावर्षी मार्च महिन्यात महापालिकेने त्यांना जागा खाली करण्यासंदर्भात नोटीस बजावली. दिलेल्या मुदतीत जागा महापालिकेच्या ताब्यात देण्यात आली नाही तर जबरदस्तीने ताब्यात घेण्यात येईल, असा इशाराही महापालिकेने नोटीसद्वारे महिला समाजाला दिला. याविरुद्ध महिला समाजाने उच्च न्यायालयात धाव घेतली. न्या. नरेश पाटील व न्या. शालिनी फणसाळकर-जोशी यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी होती.
उच्च न्यायालयाने महिला समाज व महापालिकेला सुवर्णमध्य काढण्याची सूचना केली. ‘महापालिकेने खेळ, मनोरंजन इत्यादी बाबींना पाठिंबा दिला पाहिजे. त्यामुळे काही तोडगा निघतो का पाहा,’ असे खंडपीठाने म्हटले. तर महापालिच्या वकिलांनी महिला समाजाला दादरमध्ये दोन ठिकाणी पर्यायी जागा देण्याची तयारी दर्शवूनही त्यांनी त्या जागा स्वीकारण्यास नकार दिला, असे खंडपीठाला सांगितले. तर महिला समाजाने या दोन्ही जागा म्हणजे कार्यालये असून त्यांच्यापुढे खेळाचे मैदान नाही, अशी माहिती खंडपीठाला दिली. त्यावर महापालिकेने नव्या धोरणानुसार कोणालाही खेळाच्या मैदानाचा ताबा देण्यात येणार नाही, असे खंडपीठापुढे स्पष्ट केले. तसेच उच्च न्यायालयाचा यापूर्वीचा आदेश महापालिकेच्या अधिकाराआड येत असल्याचेही खंडपीठाला सांगितले.
त्यावर खंडपीठाने महापालिकेला त्यांच्या अधिकाराचा वापर करण्याची मुभा देत याचिकाकर्त्यांना महापालिका कायद्याचे कलम १०५ (बी) अंतर्गत जागा खाली करण्याची नोटीस बजावण्याची मुभा दिली.

Web Title: The municipality has to wait

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.