बँकेच्या परीक्षेला बसलेला ‘मुन्नाभाई’ अटकेत; मायक्रोफोनद्वारे कॉपी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2025 10:18 IST2025-01-20T10:17:51+5:302025-01-20T10:18:15+5:30
Crime News: रायगड जिल्हा कॉ. ऑपरेटिव्ह बँकेच्या क्लार्क पदाच्या परीक्षेला फिल्मी स्टाइल कॉपी करणाऱ्याला वाशी पोलिसांनी अटक केली आहे. आकाश घुनवत (२८) असे आरोपीचे नाव असून तो जालन्याचा राहणारा आहे.

बँकेच्या परीक्षेला बसलेला ‘मुन्नाभाई’ अटकेत; मायक्रोफोनद्वारे कॉपी
नवी मुंबई - रायगड जिल्हा कॉ. ऑपरेटिव्ह बँकेच्या क्लार्क पदाच्या परीक्षेला फिल्मी स्टाइल कॉपी करणाऱ्याला वाशी पोलिसांनी अटक केली आहे. आकाश घुनवत (२८) असे आरोपीचे नाव असून तो जालन्याचा राहणारा आहे. आकाशला रविवारी न्यायालयात हजर केले असता एक दिवसाची पोलिस कोठडी मिळाली आहे.
वाशी येथील फादर एंग्नल शाळेत शनिवारी रायगड जिल्हा कॉ. ऑपरेटिव्ह बँकेची क्लार्क पदाच्या भरतीची परीक्षा होती. या परीक्षेला बसलेल्या एका उमेदवाराकडून मायक्रोफोनद्वारे कॉपी होत असल्याची माहिती वाशी पोलिसांना मिळाली होती.
शर्टच्या कॉलरमध्ये ब्लूटूथ
वरिष्ठ निरीक्षक संजय धुमाळ यांच्या सूचनेवरून निरीक्षक जहांगीर मुलानी यांच्या पथकाने परीक्षा केंद्रात धडक दिली. त्यांनी संशयित उमेदवाराची झडती घेतली असता त्याच्याकडे मोबाईल मिळून आला शिवाय शर्टच्या कॉलरमध्ये लपवलेला मायक्रोफोन (ब्ल्यूटूथ) देखील आढळला.
प्रश्नपत्रिकेचे काढलेले फोटो पाठवले
आकाशने फोनमध्ये एक विशिष्ट ॲप्लिकेशन घेतले होते. त्याद्वारे त्याने प्रश्नपत्रिकेचे काढलेले फोटो राहुल ठाकूर नावाच्या सहकारी व इतरांना पाठविले होते. त्यानुसार या व्यक्ती त्याला अज्ञात ठिकाणावरून मायक्रोफोनद्वारे प्रश्नांची उत्तरे सांगत होती. याप्रकरणी आकाश घुनवत याच्यासह राहुल ठाकूर व इतरांवर वाशी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.