माउलीच्या गजरात रंगला रिंगण सोहळा
By Admin | Published: January 22, 2015 01:33 AM2015-01-22T01:33:19+5:302015-01-22T01:33:19+5:30
टाळ-मृदंगाचा गजर, हाती भगवी पताका, मुखी ‘पुंडलिक वरदे हरी विठ्ठल... श्री ज्ञानदेव, तुकारामा’चे नाम घेत बुधवारी भगवान शंकराचे अधिष्ठान असलेल्या कणेरी मठ येथे पहिल्यांदाच वैष्णवांचा मेळा भरला.
कोल्हापूर : टाळ-मृदंगाचा गजर, हाती भगवी पताका, मुखी ‘पुंडलिक वरदे हरी विठ्ठल... श्री ज्ञानदेव, तुकारामा’चे नाम घेत बुधवारी भगवान शंकराचे अधिष्ठान असलेल्या कणेरी मठ येथे पहिल्यांदाच वैष्णवांचा मेळा भरला. माघवारी एकादशीआधीच प्रतिपंढरपुराची प्रचिती देणाऱ्या कणेरी मठाच्या ‘बागेची आई’ या माळरानावर एक लाख वारकऱ्यांचा आणि माउलींच्या अश्वाचा रिंगण सोहळा पार पडला.
कोल्हापुरातील कणेरी मठावर सुरू असलेल्या भारतीय संस्कृती उत्सवात वारकरी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. सुरुवातीला चोपदारांचे अश्वरिंगण सोहळ्यात पुढे होते. तीन फेऱ्या पूर्ण झाल्यानंतर मात्र माउलींच्या अश्वाने वेग धरला आणि चोपदाराच्याही पुढे धाव घेतली. हे पाहताच भाविकांनी केलेल्या पंढरीनाथाच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला. हा सोहळा पाहण्यासाठी नागरिकांनी अलोट गर्दी केली होती. उपस्थितांनी हे क्षण डोळ्यांत साठविले. (प्रतिनिधी)