मुरलीधर मोहोळ यांचं प्रमोशन; शह मेधा कुलकर्णींना !
By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2019 05:41 PM2019-11-18T17:41:13+5:302019-11-18T19:27:34+5:30
मोहोळ हे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे निकटवर्तीय मानले जातात. त्यातच त्यांची महापौरपदी वर्णी लागली आहे. अर्थात मोहोळ यांच्या प्रमोशनमुळे मेधा कुलकर्णी यांचा राजकीय प्रवास आणखी खडतर होण्याची शक्यता आहे.
मुंबई - पुण्याच्या महापौरपदी भाजपचे नगरसेवक मुरलीधर मोहोळ यांचे नाव निश्चित करण्यात आले आहे. विधानसभेसाठी कोथरूड मतदारसंघातून इच्छूक असलेल्या मोहोळ यांचे पक्षाकडून प्रमोशन झाले आहे. त्याचवेळी मोहोळ यांच्या प्रमोशनमुळे माजी आमदार मेधा कुलकर्णी यांचा मार्ग अजुनच खडतर होणार आहे.
कोथरूड विधानसभा मतदार संघात भाजपकडून विद्यमान आमदार मेधा कुलकर्णी यांना वगळून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यामुळे मेधा कुलकर्णी या नाराज होत्या. वास्तविक पाहता, मुरलीधर मोहोळ आणि कुलकर्णी यांच्यात कोथरूडच्या उमेदवारीवरून स्पर्धा सुरूच होती. मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेच्या वेळीच कुलकर्णी आणि मोहोळ यांच्या कार्यकर्त्यांमध्ये बॅनरवरून वाद झाले होते. त्यामुळे ही स्पर्धा किती टोकाला गेली होती, हे लक्षात येते.
मोहोळ-कुलकर्णी यांच्यातील वादाची दखल खुद्द मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. मात्र ऐनवेळी दोन्ही नेत्यांऐवजी पाटील यांच्याच गळ्यात येथील उमेदवारी आणि आमदारकी पडली. मोहोळ हे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे निकटवर्तीय मानले जातात. त्यातच त्यांची महापौरपदी वर्णी लागली आहे. अर्थात मोहोळ यांच्या प्रमोशनमुळे मेधा कुलकर्णी यांचा राजकीय प्रवास आणखी खडतर होण्याची शक्यता आहे.
येत्या 22 नोव्हेंबर रोजी महापौर आणि उपमहापौर पदासाठी निवडणूक होणार आहे.