नाशिकमध्ये खूनसत्र : मनपा कर्मचाऱ्याची हत्त्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2017 03:46 PM2017-05-31T15:46:22+5:302017-05-31T15:46:22+5:30
एका महापालिका कर्मचाऱ्याची हत्त्या करून मृतदेह अज्ञात हल्लेखोरांनी गोदापात्रात फेकून जाळण्याचा प्रयत्न केल्याचे आज दुपारी उघडकीस आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : शहरात गुन्हेगारी फोफावली असून सातत्याने नाशिकमध्ये होणाऱ्या खूनाच्या घटनांनी शहर हादरले आहे. शहरातील पंचवटी परिसर खूनाच्या घटनांमुळे सर्वाधिक चर्चेत आहे. मंगळवारी पंचवटी भागातील म्हसरुळजवळ राहणाऱ्या एका युवतीची हत्त्या करून मृतदेह जाळण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे उघडकीस आले होते. अद्याप या गुन्ह्याची उकल देखील झाली नसताना पुन्हा रामवाडी परिसरात एका महापालिका कर्मचाऱ्याची हत्त्या करून मृतदेह अज्ञात हल्लेखोरांनी गोदापात्रात फेकून जाळण्याचा प्रयत्न केल्याचे आज दुपारी उघडकीस आले. मृतदेहाची पोलिसांनी ओळख पटविली असून उदय कॉलनीमधील रहिवासी महापालिका आरोग्य विभागातील कर्मचारी अरूण बर्वे असे मयत इसमाचे नाव असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या खूनाच्या घटनेतील सर्व संशयित फरार आहे. याबाबत अधिक तपास पोलीस करीत आहेत. पंचवटी भागात सर्व खूनाच्या घटनांची पाळेमुळे आढळून येत आहे. मनपा कर्मचारी बर्वे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी पाठीवर, डोक्यावर, पोटावर धारधार शस्त्रास्त्राने वार केल्याचे पंचनाम्यात आढळून आले आहे. धार्मिक पर्यटनासाठी प्रसिध्द असलेला पंचवटी परिसर सध्या गुन्हेगारीच्या घटनांमुळे चर्चेत आहे.