मुलीला दलममधून बाहेर काढण्यासाठी धडपडणाऱ्या वडिलाची हत्या
By admin | Published: August 4, 2016 05:01 PM2016-08-04T17:01:02+5:302016-08-04T17:01:02+5:30
नक्षलवाद्यांच्या दलममध्ये सहभागी असलेल्या आपल्या मुलीने समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील व्हावे, नक्षलवाद्यांच्या सोबत राहू नये, अशी तीव्र इच्छा असलेल्या मुलीच्या वडिलाची माओवाद्यांनी
ऑनलाइन लोकमत
गडचिरोली, दि. ४ : नक्षलवाद्यांच्या दलममध्ये सहभागी असलेल्या आपल्या मुलीने समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील व्हावे, नक्षलवाद्यांच्या सोबत राहू नये, अशी तीव्र इच्छा असलेल्या मुलीच्या वडिलाची माओवाद्यांनी बुधवारी मध्यरात्री गळा कापून हत्या केल्याची घटना छत्तीसगड सीमेलगत असलेल्या धानोरा तालुक्यातील मोरचूल गावात घडली. या घटनेमुळे माओवाद्यांविषयी तीव्र संताप परिसरात व्यक्त केला जात आहे. या घटनेत ठार झालेल्या मृतकाचे नाव अंकालू नरोटे (५५) रा. मोरचूल तालुका धानोरा, जिल्हा गडचिरोली असे आहे.
अंकालू नरोटे हे मोरचूल या गावचे रहिवासी आहेत. हे गाव गडचिरोली- धानोरा- राजनांदगाव या आंतरराज्य महामार्गावरील सावरगावपासून तीन किमी अंतरावर वसलेले आहे. सावरगाव पोलीस मदत केंद्राच्या हद्दीत येणाऱ्या या गावातील अंकालूची २२ वर्षीय मुलगी सुशीला उर्फ राधा ही नक्षल दलममध्ये काही वर्षांपूर्वी सहभागी झाली. सुशीलाने आता दलम सोडून समाजाच्या मुख्य प्रवाहात दाखल व्हावे, अशी अंकालूची मनापासून इच्छा होती.
त्यांनी ही इच्छा सुशीला उर्फ राधा हिच्याकडे अनेकदा बोलून दाखविली. तू नक्षल दलम सोडून आमच्यासोबत राहण्यासाठी ये, असे ते वारंवार म्हणायचे. या बाबतची माहिती राधा उर्फ सुशीलाने माओवाद्यांकडेही बोलून दाखविली होती. वडिलांचा आपल्यावर सातत्त्याने याबाबत दबाव आहे, असे तिने माओवाद्यांना सांगितले. त्यामुळे संतप्त झालेल्या माओवाद्यांनी बुधवारी मध्यरात्री ११.३० वाजता मोरचूल गाव गाठले. गावात आल्यावर अंकालू नरोटेचे घर गाठून त्यांना आपल्या ताब्यात घेतले. बेदम मारहाण केली. पोरीला कशाला असा सल्ला देता, यावरून माओवादी संतप्त होते, अशी चर्चा परिसरात आहे.
त्यानंतर माओवाद्यांनी अंकालूची गळा कापून हत्या केली व मृतदेह महामार्गावर आणून टाकला. त्यानंतर नागरिकांनी गुरूवारी सकाळी सावरगाव पोलिसांना याची माहिती दिली. दुपारनंतर शवविच्छेदनासाठी मृतदेह ग्रामीण रूग्णालय धानोरा येथे आणण्यात आला. बऱ्याच काळापासून अंकालू नक्षलवाद्यांच्या हिट लिस्टवर होता, अशी माहिती या घटनेनंतर पुढे आली आहे.
गेल्या चार दिवसांत माओवाद्यांनी गडचिरोली जिल्ह्यात केलेली ही दुसरी हत्या आहे. एटापल्ली तालुक्यात एका युवकावर गोळ्या झाडून त्याला गंभीररित्या जखमी केले. माओवाद्यांचा शहीद सप्ताह ३ आॅगस्ट रोजी संपला. आतातरी हे हत्यासत्र थांबेल काय? असा प्रश्न दुर्गम भागातील नागरिक विचारत आहे.