शरीरसंबंधांच्या वादातून पनवेलमधल्या तरुणीची हत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2016 10:01 AM2016-11-16T10:01:54+5:302016-11-16T10:01:54+5:30
पनवेल खांडेश्वर येथे रहाणारी तरुणी अंजली पवारच्या हत्येचा गुंता सोडवण्यात अखेर पनवेल गुन्हे शाखेला यश मिळाले आहे.
ऑनलाइन लोकमत
नवी मुंबई, दि. १६ - पनवेल खांडेश्वर येथे रहाणारी तरुणी अंजली पवारच्या हत्येचा गुंता सोडवण्यात अखेर पनवेल गुन्हे शाखेला यश मिळाले आहे. पोलिसांनी या प्रकरणी राजकुमार पांडेला अटक केली असून, त्याने चौकशीमध्ये हत्येचा खुलासा केला. शारीरीकसंबंधाच्या वादातून ही हत्या झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.
तीन नोव्हेंबरच्या रात्री ११.३०च्या सुमारास मद्यपान केल्यानंतर राजकुमार त्याची प्रेयसी मोनिकाला भेटण्यासाठी तिच्या घरी गेला. मोनिका अंजलीच्या शेजारी रहाते. मोनिकाच्या घरचा दरवाजा बंद असल्याने त्याने मोनिकाची माहिती विचारण्यासाठी अंजलीच्या दरवाजावर थाप मारली. अंजलीने दरवाजा उघडल्यानंतर राजकुमार तिच्या घरात घुसला व शरीरसंबंध ठेवण्यासाठी जबरदस्ती करु लागला.
अंजलीने त्याला पोलिसात तक्रार करण्याची धमकी दिली. त्यामुळे चिडलेल्या राजकुमारने तिची हत्या केली व तिथून पळून गेला. राजकुमार पांडे सराईत गुन्हेगार असून त्याने आतापर्यंत २० पेक्षा जास्त घरफोडया केल्या आहेत. ६ नोव्हेंबरला पोलिसांनी अंजलीचा मृतदेह तिच्या घरातून ताब्यात घेतला.
अंजलीचे लग्न झाले होते. सुरुवातीला पोलिसांना अंजलीचा पती प्रवीण पवारवर संशय होता. पण मतभेदांमुळे २०१५ पासूनच दोघे स्वतंत्र रहात होते. १३ नोव्हेंबरला पोलिसांना जामिनावर बाहेर असलेला राजकुमार मोनिकाला भेटण्यासाठी तिच्या घरी गेला होता अशी माहिती मिळाली. १४ नोव्हेंबरला पोलिसांनी राजकुमारला तळोजा येथून अटक केली. चौकशीत त्याने हत्येची कबुली दिली.