कुख्यात गुंड नरेश चड्डी याची हत्या?
By admin | Published: July 21, 2016 03:45 AM2016-07-21T03:45:26+5:302016-07-21T03:45:26+5:30
गुंड नरेश चड्डी याला आपण मारल्याचा थेट उल्लेख केल्याने आता पोलिसांनी या संभाषणाच्या अनुषंगाने कृष्णानी याची चौकशी सुरू
उल्हासनगर : बांधकाम ठेकेदार दिनेश याला खंडणीकरिता धमकी देताना नगरसेवक गोदू कृष्णानी याने कुख्यात गुंड नरेश चड्डी याला आपण मारल्याचा थेट उल्लेख केल्याने आता पोलिसांनी या संभाषणाच्या अनुषंगाने कृष्णानी याची चौकशी सुरू केली आहे. उभयतांमधील सिंधीतील हे संभाषण व्हॉट्सअॅपवर व्हायरल झाले.
उल्हासनगरमधील रस्ता रुंदीकरणात एका दुकानावर कारवाई झाली होती. अर्धवट तुटलेल्या दुकानाच्या फेरबांधणीचा ठेका दिनेश या ठेकेदाराने घेतला होता. त्याच्याकडे नगरसेवक गोदू कृष्णानी याने अडीच लाखांच्या खंडणीची मागणी केली होती व त्याला ठार मारण्याची धमकी दिली होती. याबाबतची तक्रार ठेकेदाराने मध्यवर्ती पोलीस ठाण्यात केल्याने कृष्णानी याच्यासह दोघांवर खंडणीचा गुन्हा दाखल झाला. कृष्णानी याच्यावर यापूर्वी महापालिका अधिकाऱ्यांना धमकावल्याचा आरोप आहे.
ठेकेदार व कृष्णानी यांच्यातील मोबाइल संभाषण व्हॉट्सअॅपवर व्हायरल झाले. त्यामध्ये खंडणीकरिता धमकावताना कृष्णानी याने पप्पू कलानी याचा एकेकाळचा साथीदार व कुख्यात गुंड नरेश चड्डी याला आपणच मारल्याचा उल्लेख केला. चड्डी याचा मृतदेह दोन वर्षांपूर्वी त्याच्या घरात आढळला होता. त्या वेळी हा नैसर्गिक मृत्यू असल्याचा दावा पोलिसांनी केला होता. मात्र, आता कृष्णानी याच्या अप्रत्यक्ष कबुलीने पोलीसही चक्रावून गेले आहेत. ठाण्याचे सहपोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी या संभाषणाची गंभीर दखल घेऊन संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश दिले आहेत.
>मोबाइल संभाषणातील आवाज आपला नसून हा आपल्याला फसवण्याचा प्रयत्न आहे. - गोदू कृष्णानी, नगरसेवक