रस्त्यावरील खड्डयामुळे पत्नीच्या हत्येचा पर्दाफाश ! आरोपी पतीसह सात जणांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2017 10:01 AM2017-09-12T10:01:40+5:302017-09-12T10:22:46+5:30
मुंबई, ठाण्यासह राज्यभरात रस्त्यावर पडलेले खड्डे जीवघेणे ठरत आहेत. अनेक निष्पाप नागरीकांचे खड्ड्यांमुळे बळी जात आहेत.
विरार, दि. 12 - मुंबई, ठाण्यासह राज्यभरात रस्त्यावर पडलेले खड्डे जीवघेणे ठरत आहेत. अनेक निष्पाप नागरीकांचे खड्ड्यांमुळे बळी जात आहेत. पण याच खड्डयांमुळे हत्येचा गुन्हा उघड झाल्याची एक अजब घटना विरारमध्ये समोर आली आहे. टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार पोलिसांनी अवघ्या तीन तासात हत्येचा पदार्फाश करुन आरोपी पती, दीरासह एकूण सात जणांना अटक केली. विरारमध्ये राहणा-या रमाबाई पाटील (54) यांची त्यांच्या पतीनेच नामदेवने (57) हत्येची सुपारी दिली होती.
दोघा पती-पत्नींमध्ये वाद होते. नामदेव पालघरमध्ये आपल्या दुस-या पत्नीसोबत राहत होता. पण त्याने रमाबाईला घटस्फोट दिला नव्हता. रमाबाई आणि नामदेवमध्ये सध्या देखभाल खर्च आणि संपत्तीतल्या हक्कावरुन वाद सुरु होता. रमाबाईच्या मागण्या नामदेवला मान्य नव्हत्या. त्यामुळे त्याने पत्नीच्या हत्येचा कट रचला. यासाठी त्याने आपल्या भावाची पाडुरंग कदमची मदत घेतली.
पाडुरंगने पाच मारेक-यांना रमाबाईच्या हत्येची सुपारी दिली. त्यासाठी अडीचलाख रुपये देण्याचे ठरले. मारेक-यांना एक लाख रुपये अॅडव्हान्समध्ये दिले. उर्वरित दीड लाख रुपये मृतदेहाची विल्हेवाट लावल्यानंतर देण्यात येणार होते. मारेक-यांमध्ये एक महिलादेखील होती. त्यांनी रमाबाईशी संपर्क साधला. तिला नोकरीचे आमिष दाखवून विरारमधल्या एका फार्महाऊसवर नेले. तिथे रविवारी रात्री साडेदहाच्या सुमारास त्यांनी नायलॉन रशिने गळा आवळून रमाबाईची हत्या केली.
त्यानंतर मध्यरात्री 12.30 च्या सुमारास दोन मारेकरी रमाबाईचा मृतदेह घेऊन बाईकवरुन निघाले. कोणाला संशय येऊन नये, बाईकवर बसलेली व्यक्ती जिवंत आहे असे वाटावे यासाठी त्यांनी रमाबाईचा मृतदेह मध्ये बसवला होता. पण दुर्देवाने रस्त्यावरील एका खड्डयामुळे त्यांची मोटारसायकल घसरली आणि मृतदेहासह दोघेही खाली पडले. विरार पूर्वेला मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गापासून तीन किमी अंतरावर बुधहरपाडा कारनजन गावाजवळ खड्डयामुळे त्यांची बाईक घसरली.
आजूबाजूला गर्दी जमा झाल्याने दोघेही आरोपी घाबरले. त्यांनी मृतदेह तिथेच सोडला व बाईक घेऊन तिथून पळ काढला. जमलेल्या गर्दीतील एकाने आरोपीला ओळखले व त्याने पोलिसांना माहिती दिली. विरार पोलिसांनी अवघ्या तीन तासात तपास करुन हत्येचा पदार्फाश केला. नामदेव, पाडुरंग यांच्यासह चंद्रकांत पडवळ, लक्ष्मण कोबाद, लक्ष्मण पवार, राकेश पवार आणि वंदना यांना पोलिसांनी अटक केली आहे.