कर्जमुक्तीसाठी स्वत:सारख्या दिसणाऱ्याचा केला खून
By admin | Published: July 5, 2017 02:53 AM2017-07-05T02:53:46+5:302017-07-05T02:53:46+5:30
मोठ्या प्रमाणात झालेले कर्ज मिटवण्यासाठी विम्याची रक्कम मिळावी म्हणून स्वत:सारख्याच दिसणाऱ्या अनोळखी इसमाचा खून करून
लोकमत न्यूज नेटवर्क
लोणी काळभोर : मोठ्या प्रमाणात झालेले कर्ज मिटवण्यासाठी विम्याची रक्कम मिळावी म्हणून स्वत:सारख्याच दिसणाऱ्या अनोळखी इसमाचा खून करून फरार झालेल्यास लोणी काळभोर पोलिसांनी जेरबंद केले. तब्बल चार महिन्यांनी अकोला परिसरात त्याला पकडले. न्यायालयाने त्याला पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
याप्रकरणी दीपक कुंडलिक चौधरी (वय ३५, रा. पेठ-नायगाव, ता. हवेली) यास अटक केली आहे. त्याचा साथीदार दादा ऊर्फ अनिल साईनाथ चौधरी याच्यासह आणखी दोघांना यापूर्वी अटक केली आहे.
चौधरीला व्यवसायात तोटा झाल्याने तो कर्जबाजारी झाला होता. त्याने मोठ्या रकमेचा विमा उतरवला होता. तो लाभ मिळवण्यासाठी त्याने आपल्याच खुनाचा बनाव रचला. ८ मार्च रोजी पहाटे आपल्यासारख्या दिसणाऱ्या एका अनोळखी इसमाचा आपल्या तीन साथीदारांच्या मदतीने लोखंडी गज व दगडांच्या साह्याने खून केला. तो खून आपलाच आहे, असे वाटावे म्हणून तोंडाचा चेंदामेंदा केला. मृतदेहास स्वत:चे कपडे घातले. खिशात मोबाईल फोनसह आधार कार्डही ठेवले. यानंतर चौधरी फरार झाला. तपासात हा मृतदेह दुसऱ्याच कोणाचा असल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिसांनी त्यादृष्टीने तपास सुरू केला.
दीपकच्या मागावर लोणी काळभोर पोलीस होते. परंतु, आपल्या वास्तव्याच्या ठिकाणात तो सतत बदल करत असल्याने हाती लागत नव्हता. तो अकोला परिसरात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्याने स्थानिक पोलिसांची मदत घेऊन त्यास अटक केली.