पांढरेंची आत्महत्या की व्यवस्थेने घडवलेली हत्या?--आॅन दि स्पॉट रिपोर्ट

By admin | Published: December 11, 2015 10:52 PM2015-12-11T22:52:54+5:302015-12-12T00:15:23+5:30

मुलांचे भवितव्य टांगणीला : शेतकऱ्यांच्या आत्महत्येने तासगाव तालुका काळवंडला--

Murder by Swat Suicide System? - Ann the Spot Report | पांढरेंची आत्महत्या की व्यवस्थेने घडवलेली हत्या?--आॅन दि स्पॉट रिपोर्ट

पांढरेंची आत्महत्या की व्यवस्थेने घडवलेली हत्या?--आॅन दि स्पॉट रिपोर्ट

Next

वासुंबे येथील अशोक पांढरे या तरुण शेतकऱ्याने बुधवारी रात्री आत्महत्या केली. गेल्या वर्षभरात तासगाव तालुक्यात सातत्याने शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. त्यामध्ये आणखी एकाची भर. एवढीच काय ती या आत्महत्येची दखल. मात्र पांढरेंनी आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी पाहिल्यानंतर, ही आत्महत्या की सुस्तावलेल्या व्यवस्थेने घडवून आणलेल खून, असाच प्रश्न उपस्थित होत आहे. त्यांच्या आत्महत्येने उज्ज्वल भविष्याची स्वप्ने पाहणाऱ्या मुलांचे भवितव्यच टांगणीला लागले आहे. तासगावसारख्या सधन तालुक्यात सातत्याने होत असलेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्येंनी तालुका काळवंडला आहे.

दत्ता पाटील--तासगाव
तासगाव शहरापासून अवघ्या काही अंतरावर असणारे वासुंबे गाव. शहरातील वाढते शहरीकरण या गावापर्यंत येऊन पोहोचले आहे. याच गावाचे अशोक पांढरे हे रहिवासी. घरच्या बेताच्या परिस्थितीमुळे दहावीतून अर्धवट शिक्षण सोडले. वडिलांच्या आकस्मिक मृत्यूनंतर कुटुंबाची जबाबदारी खांद्यावर घेतली. वडिलांचा सात-बारा अशोक पांढरेंच्या नावावर झाला आणि प्रशासनाच्या नजरेतून अधिकृत शेतकरी म्हणून शिक्कामोर्तब झाले. वर्षानुवर्षे कोरडवाहू असणारी दोन एकर जमीन. गेल्या काही वर्षांपासून बागायती शेतीसाठी धडपड सुरू केली. मिळेल ते भांडवल गोळा करून उसाची शेती सुरू केली. गेल्यावर्षी फेब्रुवारी महिन्यात अर्धा एकर ऊस कारखान्याला पाठविला. त्याचे बिल दोन टप्प्यात, तेही दोन महिन्यांपूर्वी मिळाले. प्रत्येक शेतकऱ्याची शेतीबाबतीत असणारी व्यथा पांढरेंच्याही नशिबी होतीच. उसाचे २२ हजारांचे बिल मिळाले. मात्र मिळालेले उत्पन्न आणि झालेला खर्च, याची सांगड कधीच बसली नाही.
रोजगाराचे दुसरे साधन नाही. घरचा खर्च चालविण्यासाठी वर्षभरापूर्वी गाय घेतली. मात्र गाईच्या आजारपणामुळे तोटाच सहन करावा लागला. पुन्हा नव्या जिद्दीने नुकतीच एक गाय खरेदी केली. तिच्या दुधाच्या पैशावर घरखर्चाचा ताळमेळ घालण्याचा प्रयत्न सुरू होता. शेतीसाठी सोसायटी कर्ज घेतले होते. त्यातच वेळोवेळी येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी मित्र आणि नातेवाईकांकडून हातउसने पैसेही घेतले होते. मिळणारे उत्पन्न आणि होणारा खर्च, याचा हिशेब जुळेना. त्यातच मुलांच्या भवितव्याची सतावत असलेली चिंता. या नैराश्येच्या गर्तेत असणाऱ्या पांढरेंनी आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेतला.
पांढरेंनी आत्महत्येपूर्वी चिठ्ठी लिहून ठेवली आहे. त्यामध्ये जन्मदात्या आईला वृध्दापकाळात सुखी ठेवता आले नाही, याचीही खंत व्यक्त केली आहे. मुलांच्या शिक्षणासाठी जमीन विकण्याचाही उल्लेख चिठ्ठीत केला आहे. आत्महत्या करण्याऐवजी स्वत:ची जमीन विकण्याचा निर्णय घेतला असता तर...?, असाही प्रश्न अनेकांना पडेल. मात्र जन्मदात्या आईइतकेच काळ्या आईवर प्रेम करणारा कोणताही शेतकरी स्वत:ची जमीन विकण्याचे धाडस करू शकत नाही, हे वास्तव पांढरेंच्या बाबतीतही होते.


मुलांच्या भवितव्याचे काय?
अशोक पांढरे यांची मोठी मुलगी तासगावात अकरावीत विज्ञान शाखेचे शिक्षण घेत आहे. दहावीत तिने ८७ टक्के गुण मिळवून पटवर्धन कन्या प्रशालेत पहिला क्रमांक मिळवला होता. दहावीनंतर अभियंता होण्याची (अभियांत्रिकी पदविका करून पदवी घेण्याची) इच्छा असली तरी तिला घरच्या परिस्थितीमुळे अकरावीला प्रवेश घ्यावा लागला. त्याचीही खंत पांढरेंना होतीच. मुलगा तासगावच्या शाळेत नववीत आहे, तर लहान मुलगी गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत सातवीत आहे. पांढरेंच्या आत्महत्येने या मुलांचे शैक्षणिक भवितव्य टांगणीला लागले आहे.


आत्महत्या केवळ पन्नास हजारांसाठी
अशोक पांढरे यांनी शेतीसाठी सोसायटीचे १८ हजार रुपये कर्ज घेतले होते, तर उसने घेतलेल्या कर्जाची रक्कम त्यांनी चिठ्ठीत उल्लेख केल्यानुसार २९ हजार ५०० रुपये होती. कर्जाचा आकडा पन्नास हजारांवर नव्हता. एवढ्याशा रकमेसाठी शेतकरी आत्महत्या करत आहे. अशी वेळ शेतकऱ्यांवर का येत आहे, याचा विचार कोठेच होत नाही.

Web Title: Murder by Swat Suicide System? - Ann the Spot Report

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.