पत्नीसह दोन मुलींची हत्या करून गळफास
By admin | Published: February 2, 2016 04:19 AM2016-02-02T04:19:31+5:302016-02-02T04:19:31+5:30
येथील एका व्यक्तीने पत्नीसह दोन लहान मुलींची गळा आवळून हत्या करून स्वत: आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना येथील विठ्ठलनगर परिसरात घडली.
म्हारळ : येथील एका व्यक्तीने पत्नीसह दोन लहान मुलींची गळा आवळून हत्या करून स्वत: आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना येथील विठ्ठलनगर परिसरात घडली.
रणजीत नरहर यशवंतराव (४५) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव असून, पत्नी स्वाती (३८) व दोन मुली श्रद्धा (१४), आर्या (७) यांची त्याने कर्जाला कंटाळून वैफल्यग्रस्त अवस्थेत हत्या केल्याचा कयास आहे. कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीचा कर्मचारी असलेल्या रणजीतने २६ जानेवारी रोजी नातेवाइकांना कुटुंबासोबत शेगाव येथे दर्शनास जात असल्याचे सांगून मोबाइल बंद करून ठेवला होता. दरम्यान, गेल्या दोन दिवसांपासून शेजाऱ्यांना बंद सदनिकेतून दुर्गंधी येत होती. तरीही, त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले होते. परंतु, रविवारी रात्री जेव्हा जास्त दुर्गंधी सुटली, तेव्हा त्यांनी पोलिसांना कळवले असता हा प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी आत प्रवेश केला असता हॉलमध्ये रणजीत पंख्यास नायलॉनच्या दोरीने गळफास लावलेल्या अवस्थेत आणि त्याची पत्नी तेथेच दोरीने गळा आवळलेल्या अवस्थेत आढळली. दोन्ही मुलीही गळ्यास दोरीने आवळलेल्या अवस्थेत दोन वेगवेगळ्या खोल्यांमध्ये आढळून आल्या. पहाटे ३च्या दरम्यान सर्व मृतदेह पोलिसांनी उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठविले.