बॉम्बस्फोटाद्वारे पत्नीची हत्या, बांग्लादेशीला कळव्यात अटक
By admin | Published: November 5, 2016 12:05 AM2016-11-05T00:05:22+5:302016-11-05T00:05:22+5:30
बांग्लादेशातील नराईल जिल्ह्यात बॉम्बस्फोट करून सुलताना या आपल्याच पत्नीची हत्या करणाऱ्या बशीरमुल्ला शेख (४०) याला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट एकने कळव्यातून
ऑनलाइन लोकमत
ठाणे, दि. 03 - बांग्लादेशातील नराईल जिल्ह्यात बॉम्बस्फोट करून सुलताना या आपल्याच पत्नीची हत्या करणाऱ्या बशीरमुल्ला शेख (४०) याला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट एकने कळव्यातून अटक केली आहे. त्याने कळवा परिसरात चोऱ्याही केल्या आहेत. त्याला ठाणे न्यायालयाने ८ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
बशीरमुल्ला हा नवी मुंबईच्या घणसोलीतील रहिवाशी असून, एका चोरीच्या गुन्ह्याची उकल करताना त्याची खबर वरीष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांना मिळाली. याच माहितीच्या आधारे त्याला ४ नोव्हेंबर रोजी कळव्यातील मनिषानगर गेट क्रमांक एक येथून अटक केली. त्याच्यावर मुंबई पोलिसांच्या विशेष शाखेने मार्च २०१६ मध्ये बांग्लादेशातून विना पासपोर्ट, बेकायदेशीररीत्या भारतात प्रवेश केल्याच्या कायद्यान्वये कारवाई केली होती. त्या गुन्हयात तो जामीनावर सुटला होता. त्याची माहिती मिळाल्यानंतर युनिट एकचे निरीक्षक ठाकरे, रणवीर बयेस, सहायक पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी, जमादार अशोक माने, हवालदार आनंदा भिलारे, प्रकाश कदम, सुनील जाधव, सुभाष मोरे, संभाजी मोरे, शिवाजी गायकवाड, सुनील मोरे आदींच्या पथकाने त्याच्यावर पाळत ठेवून त्याला ताब्यात घेतले.
पोलीस उपायुक्त पराग मणेरे, सहायक पोलीस आयुक्त मुकूंद हातोटे यांच्या मार्गदर्शनाखाली या पथकाने त्याची चौकशी केली. त्याने बांग्लादेशात दहशतवादी संघटनांकडून बॉम्ब बनविण्याचे प्रशिक्षण घेतल्याचे उघड झाले. त्याच प्रशिक्षणामुळे त्याने त्याच्या बांग्लादेशातील घरी बॉम्ब तयार करुन नराईल जिल्हयात बॉम्बस्फोट केल्याची कबुली दिली. याच स्फोटात त्याने त्याची पत्नी सुलतानाची हत्या केली.
बशीरमुल्ला आणि इतर आरोपींविरुद्ध नराईल जिल्ह्यातील कलीया पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल असून, तो यात पसार असल्याची माहिती पोलिसांना बांग्लादेशातून मिळाली. तो कोणत्या दहशतवादी संघटनेशी संबंधित आहे? त्याच्याविरुद्ध बॉम्बस्फोट आणि इतर कोणते गुन्हे बांग्लादेशात दाखल आहेत? भारतात वास्तव्य करण्यामागे त्याचा देशविघातक हेतू आहे किंवा कसे? या सर्व बाबींचा तपास सुरू असल्याचे मणेरे यांनी सांगितले.