आर्थिक व्यवहारातून भावानेच केली हत्या

By admin | Published: March 15, 2017 04:24 AM2017-03-15T04:24:12+5:302017-03-15T04:24:12+5:30

मोबाइलच्या आर्थिक व्यवहारातून लहान भावानेच मोठ्या भावाचा काटा काढल्याची प्राथमिक माहिती धारावी गोळीबार प्रकरणातून समोर आली आहे.

The murdered by a brother in a financial transaction | आर्थिक व्यवहारातून भावानेच केली हत्या

आर्थिक व्यवहारातून भावानेच केली हत्या

Next

मुंबई : मोबाइलच्या आर्थिक व्यवहारातून लहान भावानेच मोठ्या भावाचा काटा काढल्याची प्राथमिक माहिती धारावी गोळीबार प्रकरणातून समोर आली आहे. या प्रकरणी आरोपी सनाउल्लहक जौवाद हुसेन (२७) याला अटक करण्यात आली आहे.
तो गावी पळून जाण्याच्या
तयारीत असताना पोलिसांनी त्याला जेरबंद केले.
मूळचे बिहार येथील मोतिहारी गावचे हुसेन कुटुंबीय आहेत. जियाउल्लहक जौवाद हुसेन (३२) हा तीन भावांमधला सर्वात मोठा भाऊ होता. जियाउल्लहक हा गेल्या ८ ते ९ वर्षांपासून धारावीतील राजीव गांधी नगर परिसरात राहायचा. पूर्वी सुतारकाम, जरी काम तो करत असे. तिघेही भाऊ एकत्र राहत नव्हते. त्यात सनाउल्लहक याने मोबाइल, पर्स चोरी करण्याचा मार्ग निवडल्याने तो मुंबईत येऊन जाऊन राहत होता. त्यामुळे त्याचा नेमका ठावठिकाणा त्याच्या घरच्यांनाही कळत नव्हता.
त्याने यापूर्वी काही चोरीचे मोबाइल वापरण्यासाठी दिले होते. मात्र त्याचे पैसे देण्यास तो टाळाटाळ करत असल्याने दोघांमध्ये खटके उडायचे. सोमवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास सनाउल्लहक याने जियाउल्लहक याला धारावीतील संगम गल्ली येथील मिलन हॉटेलकडे बोलावून घेतले. तेथेच मोबाइलच्या पैशांवरून त्यांच्यात वाद झाला. सनाउल्लहकने त्याच्याकडील रिव्हॉल्वरने भावावर दोन गोळ्या झाडून त्याची हत्या केली आणि तो पसार झाला.
धुळवडीच्या दिवशी घडलेल्या या घटनेमुळे धारावी परिसरात खळबळ उडाली होती. त्यात मृताची ओळख पटणेही शक्य नव्हते. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत अप्पर पोलीस आयुक्त रा. शिंदे, पोलीस उपायुक्त प्रवीण पडवळ, साहाय्यक पोलीस आयुक्त फुलसिंग पवार आणि शिलवंत यांच्या नेतृत्वाखाली तपास सुरू झाला. पाच ते सहा पथके तयार करून तपास केला. शिताफीने मृताची ओळख पटवून अवघ्या २४ तासांत आरोपीचा सुगावा लावला.
१५ मिनिटांचा फिल्मी थरार...
धारावी गोळीबार प्रकरणात जियाउल्लहकची ओळख पटताच पोलिसांनी आरोपीच्या शोधासाठी विविध पथके नेमली. अशात चौकशीत नुकताच मुंबईत आलेल्या त्याचा लहान भाऊ गायब असल्याची माहिती मिळाली. त्यात मृतकाच्या मोबाइल सीडीआरमध्येही लहान भावासोबत संभाषण झाल्याची माहिती मिळताच तपास पथकाचा संशय आणखीन बळावला.
रात्री सव्वाबाराच्या सुमारास लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सुटणाऱ्या पवन एक्स्प्रेसने सनाउल्लहक जाण्याच्या शक्यतेने पोलिसांनी तेथे धाव घेतली.
तीच अखेरची आशा पोलिसांना
होती. रेल्वे पोलिसांच्या मदतीने
त्यांनी पवन एक्स्प्रेसचा प्रत्येक डबा पिंजून काढला. एकीकडे टे्रन सुटण्याच्या वेळेतच शोधमोहीम सुरू असल्याने प्रवाशांचाही गोंधळ सुरू होता. तब्बल १५ ते २० मिनिटांच्या शोधमोहिमेनंतर आरोपी त्यांच्या नजरेस पडला. त्याने तेथूनही पळण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी त्याला अटक केली. (प्रतिनिधी)

आईला तो
कॉल अखेरचा...
घटनेच्या दिवशी जियाउल्लहक आईसोबत बोलत होता. त्याच दरम्यान त्याचा कुणासोबत तरी वाद सुरू असल्याचा अंदाज आईला आला. हे सुरू असतानाच जोराचा आवाज होत त्याचा फोन बंद झाल्याचे त्याच्या आईने पोलिसांना सांगितले. मात्र हा मुलाचा अखेरचा कॉल असेल असे जियाउल्लहकच्या आईला स्वप्नातदेखील वाटले नव्हते, असेही त्यांनी पोलिसांना सांगितले.
प्रत्यक्षदर्शीच्या मदतीने दुसऱ्या आरोपीचा शोध सुरू
घटनास्थळावरील प्रत्यक्षदर्शीच्या मदतीने या हत्येमागच्या मूळ कारणाचा शोध पोलीस घेत आहेत. तसेच सनाउल्लहककडेही पोलीस अधिक तपास करत आहेत. यामागे एका महिलेचाही संबंध असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तसेच त्याने गुन्ह्यात वापरलेले रिव्हॉल्वर कोठून व कसे आणले, या प्रकरणी अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Web Title: The murdered by a brother in a financial transaction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.