मुस्लीम आरक्षणावरून गदारोळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2017 03:48 AM2017-08-12T03:48:44+5:302017-08-12T03:48:48+5:30
अल्पसंख्यांकांना मुख्य प्रवाहात आणण्याकरिता राज्यातील भाजपा सरकारने कौशल्य विकास कार्यक्रमाच्या माध्यमातून केलेले प्रयत्न आणि केंद्र सरकारने अल्पसंख्यांक विकासाचा दुप्पट केलेला निधी, यामुळे पाच वर्षांच्या सत्ता काळानंतर जेव्हा निवडणुका होतील, तेव्हा अल्पसंख्यांक समाज भाजपासोबत असेल, असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी विधानसभेत केला.
मुंबई : अल्पसंख्यांकांना मुख्य प्रवाहात आणण्याकरिता राज्यातील भाजपा सरकारने कौशल्य विकास कार्यक्रमाच्या माध्यमातून केलेले प्रयत्न आणि केंद्र सरकारने अल्पसंख्यांक विकासाचा दुप्पट केलेला निधी, यामुळे पाच वर्षांच्या सत्ता काळानंतर जेव्हा निवडणुका होतील, तेव्हा अल्पसंख्यांक समाज भाजपासोबत असेल, असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी विधानसभेत केला.
एमआयएमचे सदस्य इम्तियाज जलील यांनी मुस्लीम समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले की, मुख्यमंत्र्यांकडून आम्हाला आशा आहे. मात्र, जेव्हा नसीम खान यांच्यासारखे काँग्रेसचे सदस्य जेव्हा या विषयावर बोलतात, तेव्हा गेली १५ वर्षे ते काय करीत होते, असा प्रश्न आम्हाला पडतो. फडणवीस यांनी हाच धागा पकडून काँग्रेसला लक्ष्य केले. मुस्लीम समाज कुणामुळे मागास राहिला, याबद्दल बोलून मला राजकारण करायचे नाही. मात्र, मागच्या सरकारपेक्षा या सरकारने अनेक योजना राबवून अल्पसंख्याकांना मूळ प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला आहे. आम्ही काँग्रेससारखे दुटप्पी नाही. राज्यघटनेनुसार जेवढे आरक्षण देय आहे, तेवढेच देण्याची आमची भूमिका आहे. ज्या राज्यांनी वेळोवेळी आरक्षण वाढविण्याची भूमिका घेतली, ते सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले आहे. आम्ही मतांच्या राजकारणाकरिता काहीही करीत नसल्याने, निवडणुका होतील, तेव्हा अल्पसंख्यांक आमच्यासोबत असतील, असा दावा मुख्यमंत्र्यांनी केला.