पाणी बाटलीच्या वासाने शोधला खुनी
By admin | Published: November 6, 2014 11:56 PM2014-11-06T23:56:56+5:302014-11-07T00:08:06+5:30
पोलीस तपास : ‘झेबा’, ‘सुझी’ श्वानांची चमक
एकनाथ पाटील --कोल्हापूर --गुंतागुंतीचे खून प्रकरण, दरोडा किंवा घरफोडी, आदी गुन्ह्यांतील आरोपींचा माग काढण्याचे काम पोलीस दलातील ‘झेबा’ व ‘सुझी’ हे दोन श्वान करीत असतात. गडहिंग्लज येथे नुकत्याच झालेल्या व्यावसायिक पहलाजराम चौधरी यांच्या खुनातील आरोपीला शोधण्याचे काम ‘झेबा’ या चार वर्षांच्या श्वानाने केले. शुद्ध पाणी बाटलीचा वास देताच तो थेट आरोपीच्या घरात घुसला, तर दोन वर्षांपूर्वी दर्शन शहा खून प्रकरणातील आरोपीचा माग काढण्यामध्ये ‘सुझी’ने पोलिसांना मदत केली. तपासामध्ये पोलिसांची मती जिथे कुंठित होते, तेथून या दोन श्वानांचा तपास सुरू होतो. त्यांच्या कार्यपद्धतीवर ‘लोकमत’ने टाकलेला प्रकाशझोत...
कोल्हापूर हे ऐतिहासिक व सांस्कृतिक परंपरा लाभलेले शहर आहे. या ठिकाणी औद्योगिकरणाचे जाळे मोठ्या प्रमाणात पसरत आहे. अशातच येथील जिल्ह्याची लोकसंख्या सरासरी २९ लाखांच्या घरात आहे. याठिकाणी दररोज खून, दरोडा, घरफोड्या, आदी गुन्हे उघडतात. या गुन्ह्यांचा तपास स्थानिक पोलीस ठाण्याबरोबरच क्राईम ब्रँच करत असते. त्यांच्या तपासाला पूरक असे पाठबळ देण्यासाठी पोलीस दलामध्ये स्वतंत्र गुन्हे शोधपथक नियुक्त करण्यात आले आहे. कितीही गुंतागुंतीचा तपास असो, त्यातूनही आरोपीचा माग काढण्याचे एकमेव काम ‘झेबा’ व ‘सुझी’ श्वान करीत आहेत. दोन वर्षांपूर्वी देवकर पाणंद येथे २५ लाखांच्या खंडणीसाठी अपहरण करून दर्शन शहा या बालकाचा खून करण्यात आला होता. त्यातील खुनी दर्शनच्या घरापासून विहिरीपर्यंत कसा गेला याचा माग ‘सुझी’ने पोलिसांना दाखविला होता. हा मार्ग पाहून पोलिसांसह नागरिकही थक्क झाले होते, तर गडहिंग्लज येथे चौधरी या व्यावसायिकाचा खून करून आरोपीने पाणी पिऊन ही बाटली टाकली होती. त्याचा वास ‘झेबा’ला देताच त्याने थेट आरोपीचे घर गाठले. आतापर्यंत या दोघांनी बहुतांश गुन्ह्यांमध्ये महत्त्वाच्या तपासाची भूमिका पार पाडली आहे.
‘झेबा’ चार, तर ‘सुझी’ सात वर्षांची आहे. त्यांना राहण्यासाठी पोलीस मुख्यालयामध्ये स्वतंत्र खोली बांधण्यात आली आहे. या दोघांनाही स्वतंत्र सुसज्ज अशा वातानुकूलित रूम आहेत. पहाटे सहानंतर त्यांच्या दिनक्रमास सुरुवात होते. पहाटे धावणे, शारीरिक व्यायाम व गुन्ह्यांचा माग काढणे याबाबत सराव केला जातो. त्यानंतर दिवसातून दोनवेळा ब्रँडेड कंपनीचे खाद्य (जेवण) दिले जाते. दिवसभरात घरफोडी, खून झालेल्या घटनेची वर्दी मिळताच घटनास्थळी रवाना होतात. त्यांना घेऊन जाण्यासाठी स्वतंत्र पोलीस व्हॅन आहे. ‘झेबा’चे प्रशिक्षक सुहास कांबळे, तर ‘सुझी’चे अमित चव्हाण आहेत. हे दोघेजण त्यांच्यावर २४ तास लक्ष ठेवून असतात.
पुन्हा सायंकाळी सहा ते साडेसातपर्यंत सराव घेतला जातो. सरावानंतर दिवसातून दोनवेळा त्यांची साफसफाई केली जाते. त्यांना आठवड्यातून एक दिवस सुटी असते.
असा केला जातो तपास
दरोडा किंवा खुनाची वर्दी आली की सुसज्ज होऊन हे पथक घटनास्थळी रवाना होते. घटनास्थळाची पाहणी करून आरोपीने एखादा पुरावा सोडला आहे का याची पाहणी केली जाते. मनुष्याच्या अंगाला एक विशिष्ट प्रकारचा वास असतो. त्याच्या हातून पडलेल्या वस्तूचा वास श्वानाला दिला जातो. त्या वासाद्वारे श्वान आरोपीचा माग काढत असतो.
आरोग्य तपासणी
दोन्हीही श्वानांची दर महिन्याला शासकीय पशुवैद्यकीय रुग्णालयात तपासणी केली जाते. तीन महिन्यांनी वेगवेगळ्या लसी व पोटातील जंत बाहेर काढण्यासाठी गोळी दिली जाते.
पोलीस मुख्यालयात ‘झेबा’ व ‘सुझी’ श्वानासाठी स्वतंत्र अशी वातानुकूलित खोली बांधण्यात आली आहे.
दहा वर्षांनी सेवानिवृत्ती
४५ दिवस पूर्ण झालेले किंवा ९० दिवसांच्या आतील चांगल्या डॉबरमॅन वंशावळीच्या सुदृढ, निरोगी पिल्लास पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना दाखवून त्याच्या तंदुरुस्तीबाबत सल्ला घेतला जातो. त्यानंतर पोलीस अधीक्षकांसमोर त्याला उभे केले जाते. वंशावळ रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र पाहून ते त्याची नियुक्ती करतात. त्यानंतर त्याचे संगोपन करून सहा महिन्यांनंतर त्याला प्रशिक्षण दिले जाते. दहा वर्षांनी त्याची सेवानिवृत्ती होते. त्यानंतर त्याची चांगली देखभाल करण्यासाठी श्वानप्रेमीस दिले जाते, अशी माहिती पथकप्रमुख बी. बी. म्हस्के यांनी दिली.