पत्नीची हत्या करून मृतदेहाचे तुकडे करणाऱ्या नराधमास जन्मठेप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2017 10:12 PM2017-01-05T22:12:12+5:302017-01-05T22:15:51+5:30
फ्रेंच पत्नीची निर्घृण हत्या करून तिचे तीन तुकडे करणारा पती गिरीश श्रीरंग पोटे ( ३२ ) याला आज ठाणे न्यायालयाने जन्मठेपेची
धीरज परब/ऑनलाइन लोकमत
मीरारोड ( ठाणे ), दि. 5 - आपल्या फ्रेंच पत्नीची निर्घृण हत्या करून तिचे तीन तुकडे करणारा पती गिरीश श्रीरंग पोटे ( ३२ ) याला आज ठाणे न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आह . ३ डिसेंबर २०१३ रोजी हे हत्याकांड घडले होते. त्यावेळी जगभरात हे हत्याकांड गाजले होते.
मूळची फ्रान्सची नागरिक असलेली मधुवंती हिने गिरीश सोबत २०१० साली प्रेमविवाह केला होता. बेरोजगार असूनही ऐशो आरामाची चटक असलेल्या गिरीशने मधुवंतीला आपल्या जाळ्यात अडकवले होते . मधुवंतीने आपल्या आईचा मुंबईतील फ्लॅट विकून त्यातून आलेल्या पैशातून हेवी डिपॉझिट वर मीरा रोडच्या नक्षत्र टॉवर मध्ये फ्लॅट घेतला होता. बेरोजगार गिरीशमुळे मधुवंतीच घरखर्च चालवत होती. आईचा फ्लॅट विकून मिळालेले पैसे संपायला आल्याने गिरीशचा तिच्या आईच्या दुसऱ्या फ्लॅट वर डोळा होता . या वरून दोघां मध्ये भांडणे होत होती . गिरीशच्या जाचाला कंटाळलेल्या मधुवंतीने पुन्हा मायदेशी फ्रान्सला जाण्याची तयारी चालवली होती .
चैन करायची चटक लागलेल्या गिरीशने यातूनच मधुवंतीची ३ डिसेंबर रोजी गळा आवळून हत्या केली. नंतर तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावायची म्हणून तिच्या शरीराचे तीन तुकडे केले . धड व डोके फ्रिज मध्ये ठेवले तर पायाचा भाग बेड मध्ये ठेवला होता . तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याच्या तयारीत असताना त्याने हत्येप्रकरणी आपल्या मामेभावास सूचकपणे बोलून दाखवल्याने हत्येचा प्रकार उघड होऊन पोलिसांनी त्याला शिताफीने अटक केली होती .
हत्येच्या आधीच त्याने अडीच वर्षाचा मुलगा ऍग्रीयन याला आपल्या आई वडिलांकडे सोडले होते. या हत्येप्रकरणी नवघर पोलीस ठाण्याचे तत्कालिन सहाय्यक निरीक्षक सतीश शिवरकर यांनी पोटेला अटक करण्यासह प्राथमिक तपास केला होता . पुढील तपास तत्कालीन निरीक्षक दिनकर पिंगळे यांनी केला होता. फ्रांसच्या सरकारने हत्येची दखल घेतली होती. मधुवंती चा मृतदेह अंत्यविधी साठी फ्रान्सला नेण्यात आला होता . आता तीन वर्षांनी या हत्येचा निकाल आला असून, ठाणे न्यायालयाने गिरीश पोटे याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे .