मुरुड तालुक्यास पावसाने झोडपले
By admin | Published: June 27, 2016 02:13 AM2016-06-27T02:13:05+5:302016-06-27T02:13:05+5:30
मुरुड तालुक्यास गेले पाच दिवस मुसळधार पावसाने झोडपून काढले.
आगरदांडा / मुरुड : मुरुड तालुक्यास गेले पाच दिवस मुसळधार पावसाने झोडपून काढले. आतापर्यंत ६८५ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली आहे. बळीराजा व नागरिकांना मोठा दिलासा या पावसाने दिला आहे. आगरदांडा वगळता कुठेही पाणी साचलेले पाहण्यास मिळाले नाही. मात्र पावसाची सुरुवात झाली तेव्हापासून काही ठिकाणी दिवसातून १५ वेळेपेक्षा अधिक काळ जास्त वीजपुरवठा खंडित होतो. या विजेमुुळे काही जणांने नुकसान झाले आहे तरीही वीज मंडळाच्या अधिकाऱ्यांना वीजपुरवठा वारंवार का खंडित होते याचे कारण अजूनपर्यंत समजू शकलेले नाही.
मुरुड शहर व पंचक्रोशीतील नागरिक या वीज मंडळाच्या अधिकाऱ्यांच्या कारभाराला कंटाळले आहेत. मुरुड तहसीलदार कार्यालयाकडून सुद्धा वारंवार वीज का खंडित होते, यासंदर्भात नोटीस बजावली आहे. तर काही पुढाऱ्यांनी वीज मंडळाच्या अधिकाऱ्यांना यासंदर्भात निवेदने दिली आहेत. या मुसळधार पावसामुळे पर्यटकांची संख्या फारच कमी झालेली दिसून येत आहे. यामुळे समुद्रकिनाऱ्याजवळील लॉज व छोट्यामोठ्या किरकोळ विक्रेत्यांचा व्यवसाय पूर्णत: थंडावला आहे. मुरुड तहसीलदार कार्यालयाकडून नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला असून, काही गंभीर प्रसंग उद्भवल्यास तातडीने तहसीलदार कार्यालय व नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन समिती यांच्याकडे संपर्क साधण्यास सांगितले आहे. सुरुवातीच्या टप्प्यातच पावसाच्या या दमदार हजेरीमुळे शेतातील सर्व भागांत पाणीच पाणी साचले आहे. एवढा पावसाचा जोर असून, या पावसाने आतापर्यंत कोणतेही आर्थिक नुकसान केलेले नाही. मात्र सतत पाऊस असल्याने सर्व व्यापाऱ्यांचा धंदा सुद्धा मंदगतीने सुरू असल्याचे दिसत आहे. (वार्ताहर)
रस्त्यावर साचले पाणी
सुरुवातीच्या टप्प्यातच पावसाच्या या दमदार हजेरीमुळे शेतातील सर्व भागांत पाणीच पाणी साचले आहे. एवढा पावसाचा जोर असून, या पावसाने आतापर्यंत कोणतेही आर्थिक नुकसान केलेले नाही. मात्र सतत पाऊस असल्याने सर्व व्यापाऱ्यांचा धंदा सुद्धा मंदगतीने सुरू असल्याचे दिसत आहे. गंभीर प्रसंग उद्भवल्यास तहसीलदार कार्यालय व नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन समिती यांच्याकडे संपर्क साधण्यास सांगितले आहे.