मुरूडच्या समुद्रात १३ विद्यार्थी बुडाले
By Admin | Published: February 2, 2016 04:23 AM2016-02-02T04:23:49+5:302016-02-02T04:24:03+5:30
पुण्याहून सहलीसाठी आलेल्या १३ विद्यार्थ्यांचा मुरूड-एकदरा समुद्रात बुडून करुण मृत्यू झाला, तर अन्य सहा विद्यार्थ्यांना वाचविण्यात बचाव दलाला यश आले. अद्याप एक विद्यार्थी बेपत्ता आहे
सहलीवर काळाचा घाला : मृतांमध्ये पुण्यातील १० मुली आणि ३ मुले, एक बेपत्ता; सहा जणांना वाचविले
आगरदांडा / अलिबाग / मुुरूड : पुण्याहून सहलीसाठी आलेल्या १३ विद्यार्थ्यांचा मुरूड-एकदरा समुद्रात बुडून करुण मृत्यू झाला, तर अन्य सहा विद्यार्थ्यांना वाचविण्यात बचाव दलाला यश आले. अद्याप एक विद्यार्थी बेपत्ता आहे. मृतांमध्ये १० मुली आणि ३ मुलांचा समावेश आहे. हे सर्व विद्यार्थी २० ते २२ वयोगटातील होते. ही हृदयद्रावक घटना सोमवारी दुपारी घडली.
पुण्यातील आबेदा इनामदार वरिष्ठ महाविद्यालयाच्या कॉम्प्युटर सायन्स विभागातील विद्यार्थी व शिक्षक तीन बसमधून रायगड जिल्ह्यात सहलीसाठी आले होते. त्यामध्ये बीएस्सी व बीसीएचे ११५ विद्यार्थी आणि ११ शिक्षक आणि कर्मचारी असा १२६ जणांचा समावेश होता. त्यातील २० विद्यार्थी पोहण्यासाठी मुरूडजवळील समुद्रात गेले आणि त्याचवेळी ते आत खेचले गेले. त्यात १३ जणांचा बुडून मृत्यू झाला.
पुण्यातून आल्यानंतर या विद्यार्थ्यांनी अलिबाग येथे पर्यटन केले. त्यानंतर सोमवारी २च्या सुमारास ते मुरूड येथे पोहोचले. तेथेच हॉटेलमध्ये जेवण केल्यावर जवळपास २० विद्यार्थी समुद्रामध्ये पोहण्यासाठी उतरले. या विद्यार्थ्यांना काही ग्रामस्थांनी हटकले मात्र तरीही विद्यार्थी समुद्राच्या पाण्यात मौज करण्याच्या हेतूने पुढे सरसावले. नंतर पाण्याचा अंदाज न आल्याने ते बुडाले.
बचावले : अनुजा चाटर्जी, सुभानी शेख, स्नेहा अनमद, कविता जिना, अल्फीया काझी, शेख शिकद हे सहा विद्यार्थी बचावले. मात्र सय्यद अली मटकी हा बेपत्ता असल्याचे आपत्ती व्यवस्थापन विभागाचे सागर पाठक यांनी सांगितले.
घटनास्थळी संस्थेचे पदाधिकारी
रवाना झाले असून, शासकीय रुग्णालयात काहींवर उपचार सुरू आहेत. १० अॅम्ब्युलन्स पुण्यातून पाठविण्यात आहेत.
- पी. ए. इनामदार, अध्यक्ष,
महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन
एज्युकेशन सोसायटी, आबेदा
इनामदार वरिष्ठ महाविद्यालय
दोन लाखांची मदत
मृत विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दोन लाखांच्या मदतीची घोषणा रायगडचे पालकमंत्री
प्रकाश महेता यांनी केली.
मृतांची नावे : सुमय्या मुमताज अन्सारी, शाफिया अन्सारी, रफिया मुमताज अन्सारी, शिफा अब्दुल बाशिद काझी, सुप्रिया पान, सना मुनीर शेख, स्वप्निल शिवाजी सलगर, साजीद चौधरी, इफ्तेखार अब्बासअली शेख, समरीन फिरोज शेख, फरीन सय्यद हुसेन, मोहम्मद युनूस इफ्तेखार अन्सारी, राजलक्ष्मी पंडुगायाला.