मुशीर खानची निर्णायक अष्टपैलू खेळी
By admin | Published: May 11, 2017 02:37 AM2017-05-11T02:37:50+5:302017-05-11T02:37:50+5:30
मुशीर खानच्या जबरदस्त अष्टपैलू खेळाच्या जोरावर मुंबई स्पोर्टिंग युनियन संघाने १६ वर्षांखालील संतोष कुमार घोष चषक
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुशीर खानच्या जबरदस्त अष्टपैलू खेळाच्या जोरावर मुंबई स्पोर्टिंग युनियन संघाने १६ वर्षांखालील संतोष कुमार घोष चषक क्रिकेट स्पर्धेत विजयी कूच करताना मुलुंड जिमखानाला अवघ्या एका विकेटने नमवले. मुलुंडने दिलेल्या १४३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबई स्पोर्टिंग युनियनचीही दमछाक झाली, परंतु मुशीरच्या जोरावर त्यांनी एक गडी राखून बाजी मारली.
पारसी सायक्लिस्ट मैदानावर झालेल्या या रोमांचक लढतीत प्रथम फलंदाजी करणाऱ्या मुलुंड जिमखानाचा डाव २४.१ षटकात १४२ धावांमध्ये गडगडला. मुशीरने चमकदार हॅट्ट्रीकसह ३४ धावांत ४ बळी घेत मुलुंडच्या फलंदाजीला खिंडार पाडले. विराज पवार (३/४४) आणि ॠतिक चौधरी (२/३२) यांनीही अचूक मारा करताना मुशीरला चांगली साथ दिली.
मुलुंडकडून केवळ तेजस देशमुखने २९ धावांची खेळी करून अपयशी झुंज दिली. यानंतर, माफक आव्हानाचा पाठलाग करताना मुंबई स्पोर्टिंग युनियनची फलंदाजीही ढेपाळली. एक वेळ स्पोर्टिंग युनियन पराभवाच्या छायेत आले होते. फलंदाजीत चमकलेल्या तेजसने गोलंदाजीत कमाल करताना ४५ धावांत ४ बळी घेत स्पोर्टिंग युनियनला बॅकफूटवर आणले, परंतु मुशीरने एकाकी किल्ला लढवताना अखेरपर्यंत टिकून राहत नाबाद ९२ धावांचा तडाखा देत, संघाला रोमांचक विजय मिळवून दिला. विशेष म्हणजे मुशीरचा अपवाद वगळता संघातील एकाही फलंदाजाला दुहेरी धावसंख्या गाठता आली नाही. अन्य लढतीत, सुवर्णलता आचरेकर इलेव्हन संघाने ७ विकेट्सने दणदणीत विजय मिळवताना, सुधांशू स्पोटर््सला सहज नमवले. प्रथम फलंदाजी करणाऱ्या सुधांशू संघाला ३३.४ षटकात १०८ धावांमध्ये गुंडाळले. यानंतर, देव मनसुखानी (४५) आणि आयुष झिम्रे (२९) यांच्याज जोरावर आचरेकर संघाने २० षटकातच ३ फलंदाजांच्या जोरावर ११० धावा काढत दिमाखदार विजय नोंदवला.