गाण्यांची कमाल अन् नृत्याची धमाल
By admin | Published: May 3, 2017 01:22 AM2017-05-03T01:22:17+5:302017-05-03T01:22:17+5:30
‘मराठी तारका’ कार्यक्रमाला प्रचंड गर्दी : पोलिस कल्याण निधीसाठी आयोजन
कोल्हापूर : दिलखेचक लावण्या, डोलायला लावणारी गाणी, नकलांचा मसाला आणि पोलिसांचे नृत्य यांमुळे पोलिस कल्याण निधीसाठी सोमवारी (दि. १) आयोजित कार्यक्रमाला रसिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. एरवी पोलिसांच्या कवायती पाहणाऱ्या मैदानाने या कार्यक्रमाच्या निमित्ताने टाळ्या आणि शिट्ट्यांचा अनुभव घेतला.
पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, पोलिस महासंचालक सतीश माथूर आणि विशेष पोलिस महानिरीक्षक यांच्या उपस्थितीमध्ये गणेशवंदनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी कोल्हापूरच्या स्वराज्य ढोल-ताशा पथकाने कलाकारांना साथ दिली. यानंतर करवीरचे पोलिस निरीक्षक दिलीप जाधव, सहायक पोलिस निरीक्षक वैष्णवी पाटील यांच्या मुलाखतींनी वातावरण हलके झाले. यानंतर हास्यसम्राट दीपक देशपांडे यांनी रंगमंचाचा ताबा घेतला. कलाकारांचे आवाज, जुन्या चित्रपटातील संवादाची पद्धत यांचे हुबेहूब सादरीकरण करीत देशपांडे यांनी टाळ्या वसूल केल्या.
यानंतर दादा कोंडके यांच्या गाण्यांवर तेजा देवकर हिने सादर केलेल्या नृत्याला रसिकांची चांगलीच पसंती मिळाली. गायक विश्वजित बोरवणकरने ‘बाजीराव मस्तानी’तील गाण्याला टाळ्या घेतल्या. खास कोलकत्त्याहून आलेल्या आरुणिता या गायिकेने ‘अब की सजन सावन में’,‘चुरा लिया है तुमने जो दिल को’,‘कॉँटा लगा’, ‘मेरे खवाबों में जो आएॅँ’ या गाण्यांवर रसिकांना डोलायला लावले.
भार्गवी चिरमुले, हेमांगी कवी यांच्या नृत्यांनाही रसिकांनी दाद दिली. यातील ‘वाजले की बारा’ला तर मंडप टाळ्यांंनी कडकडत होता. हिंदी गाण्यांवर सादर केलेल्या अमृता खानविलकरच्या नृत्यावेळी तर टाळ्यांचा पाऊसच पडला. ‘ए मेरा दिल, प्यार का दिवाना’,‘सारा जमाना, हसिनों का दिवाना’, ‘लैला मैं लैला’ या गाण्यांवर नृत्य करताना अमृताने अशा गाण्यांवरही सफाईदारपणे नाचू शकतो, हे दाखवून दिले. ‘डान्स इंडिया डान्स’मधील विजेते आदिती घोलप, विशाल जाधव यांनी ‘सैराट’मधील गाण्यांवर केलेल्या नृत्याने तर धमाल उडवून दिली. ‘शांताबाई’,‘ वाट बघतोय रिक्षावाला’ गाण्यांवरील नृत्यांना आणि कार्तिकी गायकवाडच्या ‘खंडेरायाच्या लग्नाला’ यासह सादर केलेल्या गाण्यांना रसिकांनी डोक्यावर घेतले. अंबामातेच्या गोंधळाने कार्यक्रमाची सांगता झाली. निवेदक अभिजित खांडकेकर यांनी उत्तम पद्धतीने कार्यक्रम गुंफला. स्मिता शेवाळे, केतकी पालव यांच्या नृत्यांनाही चांगली दाद मिळाली.