संगीतातील स्वर हाच ईश्वर आहे
By admin | Published: January 19, 2015 12:55 AM2015-01-19T00:55:12+5:302015-01-19T00:55:12+5:30
संगीत ही भगवंताची ईबादत आहे. स्वरांची कुठलीच भाषा नसते कारण भाषा आली की शब्द येतात आणि शब्दांना वेगवेगळे अर्थ लावले जातात. या शब्दांमुळेच काही नेते निवडून येतात आणि
उस्ताद अमजद अली खाँ : नेणारा आणि आणणारा माणसाचा देव एकच
नागपूर : संगीत ही भगवंताची ईबादत आहे. स्वरांची कुठलीच भाषा नसते कारण भाषा आली की शब्द येतात आणि शब्दांना वेगवेगळे अर्थ लावले जातात. या शब्दांमुळेच काही नेते निवडून येतात आणि शब्दामुळेच ते पराभूतही होतात. संगीत मात्र स्वरांमधून अभिव्यक्त होते. संगीत ही अनुभवाची आणि त्यापलिकडेही अनुभूतीची बाब आहे. ती भावनांची भाषा आहे, माणुसकीची आहे. जगात अनेक जाती, धर्म, पंथ, संप्रदाय असले तरी माणसाचा देव एकच आहे. जो या जगात तुम्हाला आणतो आणि घेऊन जातो तो देव एकच. त्याला नाव देण्याच्या भानगडीत मी कधी पडलो नाही. माझ्यासाठी स्वर हाच ईश्वर आहे, असे मत ज्येष्ठ सुप्रसिद्ध सरोदवादक उस्ताद अमजद अली खाँ यांनी रविवारी व्यक्त केले.
बुद्ध महोत्सवात त्यांना वादनासाठी आमंत्रित करण्यात आले होते. याप्रसंगी त्यांच्याशी संवाद साधला असता अनेक विषयांवर त्यांनी मत व्यक्त केले. कार्यक्रमापूर्वी मी सहसा मौन राहतो कारण त्यानंतर सादरीकरण करायचे असते. मौनामुळे संगीताशी अधिक जुळता येते. कार्यक्रमाला प्रारंभ करेपर्यंत काय वाजवायचे ते ठरले नसते. त्यावेळी जो मूड लागतो त्याप्रमाणे वादन घडत जाते. संगीत हे माणसांना जोडणारे आहे. त्यामुळेच संगीताचा कुठलाच मजहब नाही. हल्ली संगीत गंभीरपणे लोक शिकत नाहीत पण संगीत गंभीरपणे शिकण्याकडे नक्कीच लोक वळतील. सध्या फक्त स्वत:चा अल्बम काढण्यासाठी लोक संगीत शिकत आहेत. पण त्यामुळे संगीत समजत नाही आणि शिकताही येत नाही. ते टिकतही नाही. संगीत समजून घेण्यासाठी शिकले पाहिजे. संगीतात आयुष्याचा अर्थ दडला आहे आणि संगीत माणसाला समृद्धच करते. संगीत शिकणे म्हणजे प्रकाशाचा शोध घेणे आहे. एका अंधाऱ्या पोकळीत घुसून प्रकाशाचा शोध घेत राहणे म्हणजे शास्त्रीय संगीत आहे. त्यासाठी पेशन्स लागतोच.
शास्त्रीय गायक म्हणायचे आणि सूरांना बांधता येत नसेल तर अर्थ नाही. रंजकता नसेल तर ते संगीत कसे? रसिकांना आपले संगीत आवडायला हवे. सध्या जगातील अनेक देशात भारतीय संगीतासह फ्युजन होते आहे. फ्युजन पेक्षाही कोलॅबरेशन म्हणजे जास्त योग्य होईल, असे ते म्हणाले.