संगीतात साधनेशिवाय पर्याय नाही - आनंद भाटे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2017 02:28 AM2017-10-19T02:28:04+5:302017-10-19T02:28:21+5:30
‘दिवाळी पहाट’सारख्या सांगीतिक कार्यक्रमांमुळे रसिकांमध्ये संगीविषयीची रुची निर्माण होण्यास मदत झाली आहे. कोणते कार्यक्रम सादर होणार आहेत, कलाकार कोण आहेत. याकडे रसिकांचे लक्ष लागलेले असते. यातच अनेक मैफली सायंकालीन असल्याने सकाळच्या प्रहरातील रागांचा आस्वाद रसिकांना घेता येत नाही. ते राग ऐकण्याची संधी ‘दिवाळी पहाट’ कार्यक्रमांमधून रसिकांना मिळते, असे सांगून प्रसिद्ध युवागायक आनंद भाटे यांनी दिवाळी पहाटमध्ये एखाद्या संगीत नाटकाचा प्रयोग होण्यासही हरकत नाही, अशी अपेक्षा ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.
दिवाळी म्हणजे दिवाळी पहाट हे समीकरण आज सर्वमान्य झाले आहे. पहाटेच्या मैफली तशा विशेष होत नसल्यामुळे पहाटेच्या मैफली हेच दिवाळीचे वैशिष्ट्य आहे. बºयाच ठिकाणी एकाच वेळेला कार्यक्रम सुरू असतात. तरी सगळ्याच कार्यक्रमांना रसिकांची गर्दी असते. गेल्या चार वर्षांपासून ‘लोकमत’देखील ‘दिवाळी पहाट’करीत आहे ही कौतुकाची बाब आहे.
‘कट्यार काळजात घुसली’ आणि ‘बालगंधर्व’च्याद्वारे संगीत वेगळ्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचले. खूप जण येऊन सांगतात, की बालगंधर्वमुळे आपल्याला संगीताची इतकी मोठी परंपरा आहे हे कळले. यामुळे नाट्यसंगीतच नाही तर शास्त्रीय संगीतही ऐकायला लागलो. ‘बालगंधर्व’ आणि ‘कट्यार काळजात घुसली’ हे संगीतातील दोन माईलस्टोन ठरले आहेत.
दिवाळी पहाटमध्ये संगीत नाटके फारशी होत नाहीत. कारण नाटके ही रात्रीच होण्याची परंपरा आहे. परंतु नाट्य आणि शास्त्रीय संगीताचे
कार्यक्रम मोठ्या संख्येने होतात. दिवाळी पहाटला संगीत नाटकाचा एखादा प्रयोग व्हायला हरकत नाही. इतर ठिकाणी असे प्रयोग झालेले आहेत. पूर्वीपासून संगीताच्या प्रवाहात अनेक बदल झाले आहेत. पंडित भीमसेन जोशी यांनीदेखील संगीतात सूक्ष्म बदल केले. मात्र संगीताच्या गाभ्याला धक्का लावला नाही. नवीन काहीतरी करायचे, म्हणून परंपरा सोडून दिली तर ते योग्य ठरणार नाही. परंपरा जपून नवीन पद्धतीने सादरीकरण करण्यास कोणतीच हरकत नाही.
रागाचा गाभा तोच ठेवून नवीन वाद्यांमधून जर त्याचे सादरीकरण होत असेल तर नव आविष्काराचा अनुभव मिळतो. त्यामुळे फ्यूजन हा प्रकार चांगला की वाईट यापेक्षा तो सादर कसा केला जातो, याला जास्त महत्त्व असल्याचे ते सांगतात. हल्लीची जीवनशैली ही जलद बनली आहे. गायक आणि रसिकांच्या ऐकण्याची सहनशीलता कमी होत चालली आहे. एखादा राग पूर्वी दीड दीड तास गायला जायचा. तो आज सर्वसामान्य मैफलीमध्ये दिसत नाही.
यापुढील काळात शास्त्रीय मैफलीमध्ये हे राग सादर होत राहतील. पण छोट्या मैफलींमध्ये हे प्रमाण खूप कमी राहील. राग तीस मिनिटांमध्येसुद्धा अशा पद्धतीने सादर केला जाऊ शकतो. त्यातून मैफलीचा पूर्ण आनंद मिळू शकेल.
पंडित भीमसेन जोशींनी हे प्रयोग केले होते. त्यांनी मैफलीत दीड दीड तास राग गायले आणि त्याबरोबरीने रेकॉर्डिंगदेखील वीस ते तीस मिनिटांचे केले. कलाकारांनी हे लक्षात ठेवले पाहिजे, की तीस मिनिटांमध्ये राग सादर करताना पूर्ण गाभा त्यात आला पाहिजे. त्यामुळे ही कलाकारांची मोठी जबाबदारी आहे. रिअॅलिटी शोकडे आपण कसे पाहतो हे महत्त्वाचे आहे. याचे फायदा आणि तोटा दोन्ही आहेत. अशा शोमुळे व्यासपीठ मिळते. कलाकार, मुले आणि पालकांनी लक्षात ठेवले पाहिजे, हे आपले अंतिम ध्येय आहे. संगीतक्षेत्रात करिअर
करायचे असेल तर साधनेशिवाय पर्याय नाही.