मुंबई आणि उपनगरांमध्ये मुसळधार
By admin | Published: June 25, 2017 08:08 AM2017-06-25T08:08:34+5:302017-06-25T11:16:11+5:30
गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेणाऱ्या पावसाने आज मुंबई आणि उपनगरांमध्ये जोरदार पुनरागमन केले. मुंबई आणि उपनगरांसह ठाणे, कल्याण, डोंबिवली
Next
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 25 - गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेणाऱ्या पावसाने आज मुंबई आणि उपनगरांमध्ये जोरदार पुनरागमन केले. मुंबई आणि उपनगरांसह ठाणे, कल्याण, डोंबिवली, भाईंदर, वसई-विरार, पालघर आदी भागांमध्येही विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडत आहे.रात्रभर पडत असलेल्या पावसामुळे मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले आहे. पहाटेच्या वेळी कळवा स्थानकाजवळ आणि ठाणे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्र. 2, 3 आणि 4 दरम्यान पाणी साठल्याने मध्य रेल्वेची वाहतूक कोलमडली आहे. त्यामुळे धिम्या मार्गावरून कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या आणि येणाऱ्या गाड्या जलद मार्गावर वळवण्यात आल्या होत्या.
चांगली सुरुवात केल्यानंतर पावसाने ओढ दिल्याने चिंतेेचे वातावरण पसरले होते. दरम्यान, काल सकाळपासून पावसाने मुंबई आणि परिसरात जोरदार हजेरी लावण्यास सुरुवात केली. दरम्यान, रात्री पावसाचा जोर वाढला. मुंबई आणि उपनगरांच्या तुलनेत ठाणे, कल्याण, डोंबिवली, नवी मुंबई, पालघर आदी भागात पावसाचा जोर अधिक होता.
ठाण्यातील मानपाडा भागात पावसामुळे पालिका कार्यालयाची भिंत कोसळली. त्यात दोन वाहनांचे नुकसान झाले. कळवा आणि ठाण्यामध्ये मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेची वाहतुकही खोळंबली. कळवा स्थानकात रेल्वे रुळांवर मोठ्या प्रमाणावर पाणी साठल्याने धिम्या मार्गावरील वाहतूक थांबली. त्यामुळे धिम्या मार्गावरील लोकल जलद मार्गावरून वळवण्यात आल्या होत्या. परिणामी मध्य रेल्वेच्या काही लोकल अर्धा ते पाऊण तास उशिराने धावत आहेत. काही वेळाने धिम्या मार्गावरील वाहतूक पुन्हा सुरू करण्यात आली. पण लोकलचे वेळापत्रक पूर्णपणे कोलमडले.
Thane (Maharashtra): Heavy rainfall triggers water logging in several areas. pic.twitter.com/fId6GT00GG
— ANI (@ANI_news) June 25, 2017
शहापूर तालुक्यातील नडगाव डोंगरीपाडा येथे वीज कोसळून कल्पना वाघ आणि अर्चना वाघ या मायलेकी जखमी झाल्या. शहापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात त्यांना दाखल करण्यात आले. मात्र पुढील उपचारासाठी त्यांना ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे, अशी माहिती ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती नियंत्रण कक्षातून देण्यातून आली. पावसाने मुरबाडकडे जाणाऱ्या मार्गावरही पाणी साचल्याने वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली होती.