मुंब्य्रात मुस्लीम समाजाचा मोर्चा

By admin | Published: October 8, 2016 04:21 AM2016-10-08T04:21:03+5:302016-10-08T04:21:03+5:30

सच्चर आयोगाच्या शिफारशींनुसार मुस्लिमांनाही नोकरी आणि शिक्षणात पाच टक्के आरक्षण मिळावे

Muslim community in Mumbra | मुंब्य्रात मुस्लीम समाजाचा मोर्चा

मुंब्य्रात मुस्लीम समाजाचा मोर्चा

Next


मुंब्रा : सच्चर आयोगाच्या शिफारशींनुसार मुस्लिमांनाही नोकरी आणि शिक्षणात पाच टक्के आरक्षण मिळावे, या मागणीसाठी शुक्रवारी मुंब्रा येथे भव्य मोर्चा काढण्यात आला. मूक मोर्चा असल्याने त्याला ‘खामोश मोर्चा’ असे नाव देण्यात आले होते. राज्यातील हा पहिलाच मोर्चा होता. या मोर्चात शाळकरी मुले, तरूण, महिला, पुरुष, आणि मौलवीसह धार्मिक, राजकीय नेते सहभागी झाले होते.
दुपारच्या नमाज पठणानंतर दारुल फलाह मशिदीपासून मोर्चाला सुरुवात झाली. अडीचच्या सुमारास मोर्चा रेल्वे स्टेशनच्या दिशेने निघाला. ‘मुस्लिम देश का हिस्सेदार है, किरायेदार नहीं’, ‘मुस्लिमांना आरक्षण मिळालेच पाहिजे,’ या फलकांसह ‘उरी येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना सलाम,’ असे फलक शाळकरी मुलांनी हाती धरलेले होते. प्रत्येक चौकात नागरिक मोर्चात सहभागी होत होते. त्यात महिला, मुले, पुरुष मंडळींचा समावेश होता. मुंब्रादेवी देवस्थानच्या कार्यकर्त्यांनी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली होती. बंदोबस्तासाठी पोलिस उपायुक्त आशुतोष त्रिपुत्रे उपस्थित होते.
उच्च न्यायालय, सच्चर आयोग, मिश्रा समिती, गोपाल समिती यांनी मुस्लिमांना आरक्षण देण्याची शिफारस केली आहे. पण त्यानंतरही भाजप आणि शिवसेना युतीचे सरकार आरक्षण देण्यास टाळाटाळ करीत आहे, असा आरोप काँग्रेस पक्षाचे नेते हुसेन दलवाई यांनी केला. मुस्लिमांच्या आरक्षणाच्या मागणीला धार्मिक आरक्षण संबोधले जाते. पण ही धार्मिक आरक्षणाची मागणी नाही.
हा समाज आर्थिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेला आहे. त्याची स्थिती दलित आणि आदिवासींसारखीच आहे. मुस्लिमांमधील ओबीसींसाठी ४.५ टक्के आरक्षण द्यावे, तसेच नोकरी व शिक्षणासाठी पाच टक्के आरक्षण द्यावे. मुस्लिमांची राज्यातील लोकसंख्या ११.५ टक्के आहे. मुस्लिम समाजाने मराठा आरक्षणाच्या मागणीचे अनुकरण केले आहे. मराठा आरक्षणाला आमचा पाठिंबाच आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
राष्ट्रवादीचे नेते व ज्येष्ठ वकिल माजिद मेमन यांनी मुस्लिम समाजाला पाच टक्के आरक्षण देण्याचा अधिकार कायद्याने योग्य ठरविल्याचे सांगितले. पण भाजप व शिवसेनेचे सरकार मुस्लिमांच्या कायदेशीर अधिकाराची अंमलबजावणी करण्यास नकार देत आहे. वेळकाढूपणा, चालढकल करीत आहेत. मराठा समाजाच्या आरक्षण मोर्चाप्रमाणेच मुस्लिम समाजानेही सरकारवर दबाव टाकण्यासाठी हा मोर्चा काढला आहे. मुस्लिम समाजाच्या मागे राष्ट्रवादी काँग्रेस आहे, असे त्यांनी सांगितले.
राष्ट्रवादीचे आ. जितेंद्र आव्हाड सुरुवातीपासून मोर्चात सहभागी होते. मोर्चा संपल्यावर त्यांनी मुस्लिम समाजाच्या शिष्टमंडळाला सोबत घेऊन आरक्षणाच्या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांना सादर केले. (प्रतिनिधी)
>ठाणे, चिपळूणमध्ये १६ ला मोर्चा
मुस्लिम समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी आम्ही कोअर कमिटी स्थापन केली आहे. आरक्षणाचा पुढील मोर्चा ठाणे, चिपळूणमध्ये काढला जाणार आहे. या दोन्ही मोर्चाची तारीख १६ नोव्हेंबर आहे. चिपळूणच्या मोर्चात मी स्वत: सहभागी होणार आहे, असे दलवाई यांनी जाहीर केले. कमिटीच्या निर्णयानुसार कल्याण, भिवंडी, मालेगाव येथे मोर्चाचे आयोजन केले जाईल.

Web Title: Muslim community in Mumbra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.