आरक्षणासाठी मुस्लीम समाजाचे धरणे
By admin | Published: October 19, 2016 04:40 AM2016-10-19T04:40:40+5:302016-10-19T04:40:40+5:30
आरक्षणासह अन्य मागण्यांसाठी मुस्लीम समाज बांधवांतर्फे राज्यात विविध ठिकाणी मोर्चे काढून धरणे आंदोलन करण्यात आले
मुंबई : आरक्षणासह अन्य मागण्यांसाठी मुस्लीम समाज बांधवांतर्फे राज्यात विविध ठिकाणी मोर्चे काढून धरणे आंदोलन करण्यात आले. मराठवाड्यात औरंगाबाद जिल्ह्यात पाच ठिकाणी, परभणी जिल्ह्यातील तालुक्यांत तसेच हिंगोली आणि खान्देश, रायगडमधील अलिबाग, सोलापुरातही तहसील व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन झाले.
मराठवाड्यात मोर्चे, धरणे
मंगळवारी मराठवाड्यातही ठिकठिकाणी शांततेच्या मार्गाने मुस्लीम मोर्चे काढून धरणे धरले. बीड येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. लातूर जिल्ह्यात औसा व चाकूर तहसील कार्यालयावर मूकमोर्चा काढण्यात आला़ औरंगाबाद जिल्ह्यात पैठण, वैजापूर, खुलताबाद, कन्नड व गंगापूर येथे मोर्चे काढून धरणे आंदोलन करण्यात आले. परभणीत पाथरी, मानवत, सोनपेठ, सेलू, जिंतूर, गंगाखेड व पालम येथे तहसीलदारांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले़ हिंगोलीत मोर्चा काढून आंदोलकांनी तीन तास जिल्हा कचेरीसमोर धरणे दिले.
रत्नागिरीत समाज रस्त्यावर
रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. जिल्हाधिकारी प्रदीप पी. यांना शिष्टमंडळाने निवेदन दिले.
खान्देशात आंदोलन
खान्देशात जळगावमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.भारत मुक्ती मोर्चा, शिवराय विचार मंच, स्वराज फाउंडेशन,
संभाजी ब्रिगेडसह विविध
सामाजिक संघटनांनी सहभागी होत मागण्यांना पाठिंबा दिला. शिरपूरमध्ये (जि. धुळे) मुस्लीम समाजातर्फे तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.
सोलापुरातही आवाज घुमला
सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दिवसभर धरणे आंदोलन करण्यात आले. मराठा समाजाबरोबरच मुस्लिमांनाही आरक्षण मिळाले पाहिजे, अन्यथा समाज रस्त्यावर उतरेल, असा इशारा काझी सय्यद अहमद अली यांनी दिला. (लोकमत न्यूज नेटवर्क)