अलिबागमध्ये मुस्लीम समाजाचा मूक मोर्चा
By admin | Published: October 19, 2016 03:28 AM2016-10-19T03:28:29+5:302016-10-19T03:28:29+5:30
मुस्लिमांच्या पाच टक्के आरक्षणाचा मुद्दा तातडीने कार्यवाही करून तडीस न्यावा या मागणीकरिता जमियत-ए-उलमा रायगड या संघटनेच्या वतीने मंगळवारी येथे मोर्चाचे आयोजन केले
अलिबाग : शिक्षणापासून वंचित व हलाखीचे जीवन जगत असलेल्या मुस्लीम समाजास त्यांचे न्याय हक्क त्वरित मिळवून देण्यासाठी मुस्लिमांच्या पाच टक्के आरक्षणाचा मुद्दा तातडीने कार्यवाही करून तडीस न्यावा या मागणीकरिता जमियत-ए-उलमा रायगड या संघटनेच्या वतीने मंगळवारी येथे मोर्चाचे आयोजन केले होते. यावेळी संघटनेच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्याकरिता निवेदन रायगडचे निवासी उपजिल्हाधिकारी किरण पाणबुडे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.
मोर्चामध्ये जमियत-ए-उलमा अलिबागचे प्रमुख मुजफर चौधरी ऊर्फ मोदी, मुस्लीम समाजाचे नेते ईम्तियाज पालकर, माजी उपनगराध्यक्ष लायक अली, माजी नगरसेवक लतिफ घट्टे आदि मान्यवर व तालुक्यांतील मुस्लीम बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. जमियत उलेमा हिंद ही एकमेव राष्ट्रीय संघटना असून भारतीय स्वातंत्र्य लढ्यात संघटनेचे योगदान आहे.
महाराष्ट्र सरकारने मराठा समाजासाठी १६ टक्के व मुस्लीम समाजासाठी ५ टक्के अध्यादेश काढून सरकारी नोकरी व शैक्षणिक संस्थांमध्ये आरक्षण निश्चिती केली होती. त्यात उच्च न्यायालय, मुंबई यांनी कायद्याच्या कसोटीवर ५ टक्के मुस्लीम आरक्षणासंदर्भात अध्यादेशाची कालमर्यादा संपून देखील सरकारने काहीही पावले न उचलल्यामुळे मुस्लीम आरक्षण अधांतरीच राहिल्याचे या निवेदनातून लक्षात आणून दिले आहे. मुस्लीम समाजास त्यांचे न्याय हक्क त्वरित मिळवून देण्यासाठी मुस्लिमांच्या ५ टक्के आरक्षणाचा मुद्दा तातडीने कार्यवाही करुन तडीस न्यावा, अन्यथा राज्यव्यापी आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही या निवेदनात देण्यात आला आहे. (विशेष प्रतिनिधी)
>महाडमध्ये विविध मागण्यांचे तहसीलदारांना निवेदन
महाड : मुस्लीम समाजाला आरक्षण मिळावे, या प्रमुख मागणीसाठी जमियत-ए-हिंद या संघटनेच्या नेतृत्वाखाली मुस्लीम समाज एकवटला असून महाडमध्ये मुस्लीम बांधवांचा तहसील कार्यालयावर भव्य मूक मोर्चा नेण्यात आला होता. काकरतळे मोहल्ला येथील मशिदीपासून या मोर्चाला सुरुवात झाली. प्रांताधिकारी सुषमा सातपुते यांना विविध मागण्यांचे निवेदन दिल्यानंतर हा मोर्चा महाड बाजारपेठेतून तहसीलदार कार्यालयावर नेण्यात आला. मोर्चेकऱ्यांच्या शिष्टमंडळाने तहसीलदार औदुंबर पाटील यांनाही मागण्यांचे निवेदन दिले. समाज बांधवांसमोर बोलताना मुफ्ती मुजफर सेन यांनी जमियत-ए-हिंद ही एकजूट म्हणजे मुस्लीम समाजाचा आवाज आहे.या संघटनेचा भारतीय स्वातंत्र्य संग्रामात सिंहाचा वाटा असून ही संघटना देशात समता, बंधुता व सामंजस्यासाठी सदैव प्रयत्न करीत असल्याचे सेन यांनी सांगितले. मुस्लीम समाजाला पाच टक्के आरक्षण देण्यात आलेले होते, मात्र हे आरक्षण रद्द करण्यात आले. आता मुस्लीम समाजाला वीस टक्के आरक्षण मिळावे, अशी मागणीही मुफ्ती सेन यांनी केली. संघटनेचे रायगड जिल्हाध्यक्ष मौलाना मुफ्ती अजगर म्हणाले की, भारतीय संविधानाच्या कलम १५, १६ नुसार मुस्लीम समाजाला आरक्षणाचा हक्क आहे. हिंदू आणि मुस्लीम देशाच्या चेहऱ्याचे दोन डोळे असून एक जरी डोळा फुटला तर हा चेहरा विदू्रप बनेल.या मोर्चात मुफ्ती रफीक पुरकर, महाडचे नगराध्यक्ष महमदअली पल्लवकर, माजी नगराध्यक्ष मेहबूब कडवेकर, डॉ. फैजल देशमुख, वजिर कोंडीवकर, असत्तार तरे, अकलाक तांबे, इनायत देशमुख, मन्सूर ताज, अ. सलाम जलाल, आकीब ताज आदि प्रमुखांसह मुस्लीम बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. काकरतळे मोहल्ला येथील मशिदीपासून सुरू झालेल्या या मोर्चाची अगदी शांततेत, शिस्तबद्ध पद्धतीने कोणताही गोंधळ न करता तहसील कार्यालयासमोर सांगता करण्यात आली.