मुस्लीम-दलित मतांचं समीकरण बिघडल्यास 'वंचित'लाच फटका !

By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2019 03:42 PM2019-09-09T15:42:19+5:302019-09-09T15:45:54+5:30

अखेरीस तोडगा निघाला नसल्याने एमआयएमने बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. एकूणच काँग्रेसप्रमाणेच एमआयएमला देखील वंचितमध्ये दुय्यम स्थान मिळाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्यामुळे एमआयएमने बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येते.

Muslim-Dalit vote will divide due to separation of VBA | मुस्लीम-दलित मतांचं समीकरण बिघडल्यास 'वंचित'लाच फटका !

मुस्लीम-दलित मतांचं समीकरण बिघडल्यास 'वंचित'लाच फटका !

Next

मुंबई - आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील युती आणि आघाड्यांच्या चर्चांना वेग आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेक सभांमध्ये भाजप-शिवसेना युती निश्चित असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे युतीची शक्यता वाढली आहे. तर, आघाडीची बोलणी अद्याप अधांतरीच आहे. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर आणि काँग्रेस यांच्यात अजुनही एकमत झाले नाही. तर जागा वाटपात दुय्यम स्थान मिळल्याने एमआयएमने 'एकला चलो रे'चा नारा देत वंचितला जय महाराष्ट्र केले आहे. याचा लाभ एमआयएमला फारसा होणार नसला तरी वंचितला तोटाच होणार हे स्पष्ट आहे.

लोकसभा निवडणुकीत प्रकाश आंबेडकरांनी मुस्लीम आणि दलित मतांचं समीकरण जुळवून दखल घेण्याजोगी मतं मिळवली होती. त्यामुळे हे समीकरण विधानसभेला आणखी प्रभावी ठरणार असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. परंतु, एमआयएम बाहेर पडल्याने आंबेडकर एकट्यानेच निवडणुकीला सामोरे जाण्याची शक्यता आहे. वास्तविक पाहता वंचितमधून बाहेर पडून एमआयएमच्या ताकदीला बऱ्याच मर्यादा येणार आहे. तर मुस्लीम मतांना सोडून निवडणूक लढविण्याचा निर्धार करणाऱ्या वंचितला नुकसानच होण्याची शक्यता अधिक आहे. तसेच एमआयएमचं राज्यातील संघटन पाहता, ही मते पुन्हा काँग्रेसकडे वळण्याची शक्यता आहे.

लोकसभा निवडणुकीत बसलेल्या फटक्यामुळे काँग्रेसकडून विधानसभा निवडणुकीत वंचितला सोबत घेण्यासाठी प्रयत्न करण्यात आले होते. परंतु, याला प्रकाश आंबेडकरांकडून फारसा प्रतिसाद मिळाला नाही. उलट वंचितने सुरुवातीला काँग्रेसला ४० जागांची ऑफर दिली. त्यानंतर वंचितने काँग्रेसला १४४ जागांची ऑफर देत काही एक अट घातली. यामध्ये राष्ट्रवादीला सोबत न घेण्याची अट आंबेडकरांनी ठेवली आहे. त्यावर काँग्रेस तयार नाही. त्यातच काँग्रेस हायकमांडकडून देखील 'वंचित'शिवाय तयारीला लागण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यामुळे काँग्रेस-वंचित एकत्र येण्याच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

दरम्यान काँग्रेस-वंचित आघाडीच्या आशा धुसर दिसू लागल्यानंतर एमआयएमने प्रकाश आंबेडकरांकडे १०० जागांची मागणी केली होती. त्यावर अनेक दिवस आंबेडकरांनी काहीही प्रतिक्रिया दिली नाही. अखेरीस एमआयएमसोबत बोलणी झाल्याचे सांगत आमचं ठरल्याचं आंबेडकरांनी स्पष्ट केलं. परंतु, जागांचा फॉर्म्युला सांगितला नव्हता. अखेरीस तोडगा निघाला नसल्याने एमआयएमने बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. एकूणच काँग्रेसप्रमाणेच एमआयएमला देखील वंचितमध्ये दुय्यम स्थान मिळाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्यामुळे एमआयएमने बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येते.

Web Title: Muslim-Dalit vote will divide due to separation of VBA

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.