मुस्लिम महिलेने मंदिरात दिला मुलाला जन्म, नाव ठेवणार 'गणेश'
By admin | Published: October 6, 2015 02:43 PM2015-10-06T14:43:14+5:302015-10-06T14:48:44+5:30
मुंबईत एका मुस्लिम महिलेने गणपती मंदिरात मुलाल जन्म दिला असून तिने त्याचे नाव 'गणेश' असा ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ६ - देशातील धार्मिक तेढ वाढवणा-या अनेक घटना घडत असतानाच देशाची आर्थिक राजधानी, स्वप्नांची नगरी असलेल्या मुंबईत मात्र एका मुस्लिम महिलेने मंदिरात मुलाल जन्म दिला असून तिने त्याचे नाव 'गणेश' असा ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
मुंबईत राहणा-या इलियाजची पत्नी नूर हिला प्रसूती कळा येऊ लागल्याने तो तिला टॅक्सीतून रुग्णालयात नेत होता, मात्र रस्त्यातच तिच्या कळा वाढल्या. महिलेची प्रसूती आपल्याच टॅक्सीत होणार हे लक्षात आल्याने टॅक्सी ड्रायव्हरने गाडी पुढे नेण्यास नकार दिला. त्यामुळे इलियाज व नूर खाली उतरले, दुसरी टॅक्सी मिळेपर्यंत इलियाजने पत्नीला जवळच्याच गणपती मंदिरात बसवले, मात्र तोपर्यंत नूरची अवस्था अधिक बिकट झाली होती. त्यावेळी मंदिरात उपस्थित असलेल्या काही महिला भाविकांनी हा प्रकार बघितला आणि परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन समयसूचकता दाखवत नूरची प्रसूती करण्याचा निर्णय घेतला. आसपासच्या घरांमधून काही चादरी व साड्या गोळा करून त्यांनी मंदिरातच नूरची यशस्वी प्रसूती केली आणि नूरने एका गोंडस मुलाला जन्म दिला.
'मी रस्त्यावरच प्रसूती कळांनी व्हिवळत होते आणि त्यावेळीच बाजूला एक मंदिर असल्याचे माझ्या लक्षात आले. ईश्वराची कृपादृष्टी आमच्यावर होती, त्यामुळेच मी गणपतीच्या मंदिरात माझ्या बाळाला जन्म दिला, यापेक्षा अजून चांगलं काय असू शकतं? म्हणून आम्ही आमच्या मुलाचे नाव गणेश ठेवण्याचा निर्णय घेतला आहे, असे नूरने सांगितले.