मुस्लिम तरुणांनी पुकारला ‘बंधुभाव-भाईचारा’
By admin | Published: November 30, 2015 02:03 AM2015-11-30T02:03:47+5:302015-11-30T02:03:47+5:30
जगासमोर दहशतवादाचे भीषण संकट आहे. कोणताही धर्म दहशतवादाची शिकवण देत नाही. भारतीय हीच आपली प्रथम ओळख असून धर्म नंतर येतो.
पुणे : जगासमोर दहशतवादाचे भीषण संकट आहे. कोणताही धर्म दहशतवादाची शिकवण देत नाही. भारतीय हीच आपली प्रथम ओळख असून धर्म नंतर येतो. धार्मिक सौहार्द व बंधुभाव रुजवण्यासाठी संवादाचा सेतू उभारणे गरजेचे असल्याचे मत दहशतवादविरोधी पथकाचे सहायक पोलीस आयुक्त भानुप्रताप बर्गे यांनी व्यक्त केले.
‘बंधुभाव-भाईचारा’ संकल्पनेतून शेकडो मुस्लिम तरुणांनी एकत्र येऊन पॅरिस हल्ला आणि दहशतवादाचा निषेध केला. मार्केट यार्ड येथील न्यू एरा सोसायटीच्या मैदानात आयोजित या कार्यक्रमात बर्गे बोलत होते. या वेळी अॅड. अभय छाजेड, एटीएसचे वरिष्ठ निरीक्षक बापू कुतवळ, सुनील तांबे, अरविंद गोकुळे, मौलाना कारी इद्रिस, भरत कांबळे, शाहीद इनामदार, शब्बीरभाई शेख, इसाक चाबीवाले, सहायक निरीक्षक विनोद पाटील, नितीन कदम आदी उपस्थित होते. बर्गे म्हणाले, ‘‘छत्रपती शिवाजी महाराजांच्या सर्वच विभागांचे प्रमुख मुस्लिम होते. त्यांच्यामध्ये कधी भेदभाव आला नाही. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात मुस्लिम समाजाचे योगदान मोठे आहे. अनेक क्रांतिकारक आणि कार्यकर्त्यांनी देशासाठी आपले रक्त सांडले असून बलिदानाची ही परंपरा आजही कायम आहे. देशाच्या सुरक्षेसाठी सीमेवर लढताना अनेक मुस्लिम सेना अधिकाऱ्यांनी बलिदान दिले आहे. त्यामुळे या देशावर मुस्लिमांचाही तेवढाच अधिकार आहे.’’
‘मुस्लिम तरुणकिंडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे. त्यांनाही समान संधी उपलब्ध करुन दिल्या पाहिजेत’’ असे छाजेड या वेळी म्हणाले. ‘‘जगातील कोणताही धर्म दहशतवादाची शिकवण देत नसून, इस्लाममध्ये हिंसेला आणि दहशतवादाला थारा नाही. त्यामुळे तरुणांनी अशा प्रलोभनांपासून दूर राहण्याचे आवाहन मौलाना कारी इद्रिस यांनी केले. मस्जिद आणि मदरशांमध्ये शिक्षण घेणाऱ्या चिमुकल्यांनी हातामध्ये दहशतवादाचा निषेध करणारे फलक घेऊन मैदानाभोवती पदयात्रा काढली. यासोबतच महर्षीनगर येथील मस्जिदीमधील मुलांनी ‘धार्मिक एकता आणि इस्लामची शिकवण’ या विषयावर नाटिका सादर केली. या कार्यक्रमाचे आयोजन शब्बीरभाई शेख, यासीन शेख, जकिरीया मेमन, नूर सय्यद, बाझीलभाई शेख, सोहेल इनामदार, रहिमुद्दीनभाई शेख, रवी शिंदे, संदीप शहा यांनी केले होते.