"... म्हणून भारतातील 99 टक्के मुस्लिम 'हिंदुस्थानी' आहेत", RSS नेते इंद्रेश कुमार यांचे मोठे विधान
By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2022 08:51 AM2022-11-14T08:51:31+5:302022-11-14T10:02:21+5:30
Indresh Kumar : 'मुस्लिम राष्ट्रीय मंच'च्या कार्यशाळेत महिला कार्यकर्त्यांसह राज्यभरातील 40 हून अधिक ठिकाणांहून एकूण 250 कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला.
ठाणे : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) नेते इंद्रेश कुमार (Indresh Kumar) यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांच्या मताचे समर्थन केले आहे. सर्व भारतीयांचे पूर्वज एकच होते, त्यामुळे त्यांचा डीएनए एकच आहे, असे मत मोहन भागवत यांनी व्यक्त केले होते. यातच आता भारतातील 99 टक्के मुस्लिम हे त्यांचे पूर्वज, संस्कृती, परंपरा आणि मातृभूमीच्या दृष्टीने 'हिंदुस्थानी' आहेत, असे इंद्रेश कुमार यांनी म्हटले आहे.
ठाणे जिल्ह्यातील उत्तन येथील रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची मुस्लिम शाखा 'मुस्लिम राष्ट्रीय मंच' (एमआरएम) च्या कार्यकर्त्यांच्या दोन दिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळेच्या समारोप समारंभात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते इंद्रेश कुमार बोलत होते. यादरम्यान ते म्हणाले, ' आपल्याला पवित्र कुराणच्या सूचना आणि तत्त्वांनुसार, आपल्या राष्ट्राप्रती असलेले आपले कर्तव्य सर्वोच्च आणि इतर सर्व गोष्टींपेक्षा महत्त्वाचे मानले पाहिजे.'
इंद्रेश कुमार यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या 'भारतीयांचा डीएनए समान आहे' या विधानाचा हवाला देत ते म्हणाले, 'डी म्हणजे स्वप्ने, जी आपण रोज पाहतो. एन मूळ राष्ट्र दर्शवतो आणि ए पूर्वजांचे प्रतिनिधित्व करतो.' दरम्यान, 'मुस्लिम राष्ट्रीय मंच'च्या कार्यशाळेत महिला कार्यकर्त्यांसह राज्यभरातील 40 हून अधिक ठिकाणांहून एकूण 250 कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. यावेळी एमआरएमचे राष्ट्रीय निमंत्रक इरफान अली पिरजादे, विराग पाचपोर यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
काय म्हणाले होते मोहन भागवत?
सर्व भारतीयांचा डीएनए एकच आहे. मग तो कुठल्याही धर्माचा असो, असे स्पष्ट मत मांडत सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat)यांनी लिंचिंगमध्ये (Lynching ) सहभागी असणारे लोक हे हिंदुत्वाच्या (Hindutwa) विरोधात असल्याचे विधान केले आहे. गेल्यावर्षी गाझियाबाद येथे मुस्लिम राष्ट्रीय मंचाने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात संबोधित करताना मोहन भागवत यांनी हे मत मांडले होते. या कार्यक्रमामध्ये त्यांनी सांगितले होते की, आम्ही गेल्या 40 वर्षांपासून एकाच पूर्वजांचे वंशज आहोत, हे सिद्ध झाले आहे. भारतीय लोकांचा डीएनए हा एकसारखा आहे. तसेच हिंदू आणि मुसलमान हे दोन समूह नाही आहेत. त्यांना एकजूट करण्यासाठी काही करण्याची गरज नाही, कारण ते आधीपासूनच एकजूट आहेत.