सुपारीबाज, भाडोत्री शब्दावरून मुस्लीम आंदोलक संतापले; ठाकरेंसोबतचा तो फोटो दाखवला अन्...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2024 07:09 PM2024-08-12T19:09:20+5:302024-08-12T19:11:03+5:30
मातोश्रीबाहेर आंदोलन करणारे एकनाथ शिंदेंचे भाडोत्री, सुपारीबाज आंदोलक होते असा आरोप संजय राऊतांनी केला होता. त्यावरून मुस्लीम आंदोलकांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
ठाणे - जेव्हा तुम्हाला मते दिली तेव्हा भाडोत्री, सुपारीबाज दिसलो नाही का?, मत घेतल्यानंतर तुम्हाला दाढी टोपीवाला माणूस असा दिसतोय. आज आम्ही ज्या मतदारसंघात आहोत तो भाग एकनाथ शिंदेंच्या मतदारसंघात येतो. विद्यमान मुख्यमंत्री आणि खासदार यांच्या विरोधात जाऊन आम्ही इथून राजन विचारेंना मतदान केले. आज जे ते शब्द वापरतायेत, लोकांना केवळ वक्फ बोर्ड सुधारणा विधेयक आलंय त्यावर यांनी विरोध करावा हीच अपेक्षा होती. आम्ही तुम्हाला मतदान दिले. त्यामुळे तुमच्याकडून अपेक्षा होती. तुम्ही सभागृहातून बाहेर पडला. तुमची भूमिका काय हे तरी सांगा असं सांगत मातोश्रीबाहेर आंदोलन करणाऱ्या मुस्लीम आंदोलकांनी संजय राऊतांवर पलटवार केला.
मुस्लीम आंदोलक म्हणाले की, ९ खासदारांनी संसदेतून विधेयकाच्या चर्चेवेळी बाहेर गेले. त्यावर स्पष्टीकरण देण्याऐवजी तुम्ही मुस्लिमांवर आरोप लावताय. राजन विचारे यांच्या प्रचारात आमची माणसे होती. फैजान शेखचं फेसबुक बघा. या भागातून राजन विचारेंना ४९९ मते पडली. नरेश म्हस्केंना १०३ मते पडली. ही मते मुस्लिमांनी दिली. तुम्ही आज मुस्लिमांना दलाल बोलताय. उद्धव ठाकरेंसोबत आमचे फोटो आहेत, राजन विचारे यांच्यासोबत माझे फोटो आहेत. संजय राऊतांचे काम केवळ माध्यमांत येणं आणि बोलणं इतकेच आहे. त्यापेक्षा मुस्लिमांसाठी काम करा. आम्ही ठाण्याचे असलो, फोटो शिंदेसोबत दाखवून हा तर्क होत नाही. आज फैजान शेख ज्याने या लोकांना निवडून आणण्यासाठी जीवापाड मेहनत घेतली आज तोही याविरोधात आहे. जर विधेयकावर स्पष्ट भूमिका घेतली नाही तर उद्या महाराष्ट्र विरोधात जाईल. यात राजकीय हेतू दाखवणं, फोटो दाखवणे हा बालिशपणा आहे. संजय राऊत यांनी गंभीरपणे भाष्य करावे. जर आम्हाला बोलावलं तर आम्ही जरुर चर्चेला येऊ असं त्यांनी सांगितले.
तसेच मुस्लीस समाजानं मोठ्या संख्येने शिवसेनेला मतदान केले. हे त्यांनाही माहिती आहे आणि राज्याला, देशालाही माहिती आहे. आज भाजपाला बहुमत मिळालं नाही. ते यूपीत हाफ झाले आणि साऊथला साफ झालेत. त्यामुळे त्यांनी मुस्लिमांना मिरची लावण्यासाठी वक्फ सुधारणा विधेयक आणलं. वक्फ काय हे देशातील जनतेला कळायला हवं. वक्फ हे आजचं नाही तर स्वातंत्र्यापूर्वीचं मुघलांच्या काळातून चालत आलेले आहे. मुस्लीम समाजातील लोक वक्फ बोर्डला दान देतात. दान करण्यामागचा उद्देश देशातील ८० टक्के मुस्लीम समाज हा गरीब आहे. २ वेळच्या जेवणासाठी संघर्ष केला जातो आज या लोकांना त्रास दिला जातोय. वक्फ बोर्डाच्या संपत्तीतून या गरिबांना फायदा मिळतो. या फायद्यापासून मुस्लिमांना दूर ठेवण्याचं भाजपाचं षडयंत्र होते. कमीत कमी उद्धव ठाकरेंनी यावर भूमिका घ्यायला हवी होती. वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकावर खासदारांनी आवाज उचलायला हवा होता. ते सभागृहातून बाहेर गेले आणि कॅन्टिनमध्ये जाऊन बसले असा आरोप मुस्लीम आंदोलकांनी केला. एबीपीवर दिलेल्या मुलाखतीत ते सगळे बोलत होते.
दरम्यान, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांसोबत एक फोटो दाखवून तुम्ही आंदोलनाची दिशाभूल करताय. उद्धव ठाकरेंना मेसेज जायला हवा यासाठी मातोश्री बाहेर आंदोलन केले. आम्ही कुठल्या पक्षाचे पदाधिकारी नाही. आम्ही शांततेने आमच्या मागण्या केल्या. कुणाविरोधात अपशब्द वापरले नव्हते. उद्धव ठाकरेंच्या खासदारांना कदाचित या विधेयकाचं महत्त्व फारसं माहिती नसावे. वक्फ बोर्डाला मुस्लीम समाजातील लोक दान करतात. त्याचा फायदा गरिबांना दिला जातो. त्यात तुम्ही गैरमुस्लिमांना आणताय. त्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देताय. जर आमचे अधिकार या लोकांना दिले तर आधी १ मस्जिद गेली आणि सर्व मस्जिद हातातून जातील. भाजपा षडयंत्र रचत आहे. तुम्ही इंडिया आघाडीचे घटक म्हणून भूमिका घ्यायला हवी होती. वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकावर उद्धव ठाकरेंनी त्यांची स्पष्ट भूमिका घ्यायला हवी. या विधेयकाविरोधात उभं राहायला हवं. मुस्लिमांनी तुम्हाला मते दिली ती चुकीच्या ठिकाणी जात नाहीत हा संदेश उद्धव ठाकरेंनी मुस्लीम समाजाला द्यायला हवा अशी मागणी या मुस्लीम आंदोलकांनी केली.