मातृभाषेत दर्जेदार शिक्षण मिळणे गरजेचे
By admin | Published: May 25, 2015 03:26 AM2015-05-25T03:26:11+5:302015-05-25T03:26:11+5:30
इंग्रजीला विनाकारण डोक्यावर घेतले जात असून मातृभाषेत शिक्षण घेतल्यास कोणत्याही क्षेत्रात आपण कमी पडत नाही. त्यामुळे मातृभाषेत दर्जेदार शिक्षण मिळण्यासाठी शासनाने गांभीर्याने प्रयत्न करावेत
यावल (जि. जळगाव) : इंग्रजीला विनाकारण डोक्यावर घेतले जात असून मातृभाषेत शिक्षण घेतल्यास कोणत्याही क्षेत्रात आपण कमी पडत नाही. त्यामुळे मातृभाषेत दर्जेदार शिक्षण मिळण्यासाठी शासनाने गांभीर्याने प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा ज्ञानपीठ पुरस्कार विजेते साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांनी येथे व्यक्त केली.
यावल तालुक्यातील सांगवी बुद्रुक येथील आपल्या निवासस्थानी आलेल्या मान्यवरांशी बोलताना
ते म्हणाले, सध्या मराठी
माध्यमाच्या शाळा ओस पडत असल्याचे आणि ग्रामीण भागातही इंग्रजी शाळा उघडल्या जात असल्याचे चित्र आहे.
मात्र मातृभाषेतील शिक्षण केव्हाही चांगले आहे. चीन, जपान आदी देशांना भेटी दिल्यानंतर तेथे स्थानिक भाषेतून शिक्षण दिले जाते. त्यामुळे ते देश पुढारले असल्याचे त्यांनी सांगितले.
भारतातील तामिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेश राज्यातील उदाहरणेही त्यांनी दिली. अर्थातच शासनाने मातृभाषेतून शिक्षण देताना त्याचा दर्जा उंचावण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
ज्ञानपीठ पुरस्कार मिळाल्यानंतर नेमाडे प्रथमच त्यांच्या गावी आले असून जिल्ह्यातून विविध मान्यवर लोक त्यांना भेटण्यासाठी येत आहेत. त्यांच्या भेटीसाठी आलेल्या प्रत्येकाची ते स्वत: विचारपूस करीत आहेत. (प्रतिनिधी)