मुस्तफा डोसाचा मृत्यू
By admin | Published: June 29, 2017 02:03 AM2017-06-29T02:03:17+5:302017-06-29T02:03:17+5:30
१९९३ मुंबई साखळी बॉम्बस्फोटांप्रकरणी दोषी ठरवलेल्या मुस्तफा डोसा याचा बुधवारी जे.जे. रुग्णालयात हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : १९९३ मुंबई साखळी बॉम्बस्फोटांप्रकरणी दोषी ठरवलेल्या मुस्तफा डोसा याचा बुधवारी जे.जे. रुग्णालयात हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. त्याला उच्च रक्तदाब व मधुमेहाचा होता.
विशेष टाडा न्यायालयाने १६ जून रोजी त्याला १९९३ साखळी बॉम्बस्फोटांप्रकरणी दोषी ठरवले होते. न्यायालयाने दोषी ठरवल्याबद्दल डोसाला धक्का बसला होता. त्याच्या चेहऱ्यावरचा तणाव स्पष्ट दिसत होता. या निर्णयानंतर त्याची तब्येत खालावत गेली. त्यामुळे न्यायालयाने त्याला रुग्णालयात दाखल होण्यास सांगितले. मात्र डोसाने स्पष्ट नकार दिला. ‘मरायचंच आहे तर रुग्णालयात दाखल का होऊ?’ असे त्याने न्यायालयाला सांगितले.
डोसाची तब्येत बिघडल्याने मंगळवारी मध्यरात्री १च्या सुमारास त्याला जे.जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे तीन तासांच्या उपचारानंतर त्याला आर्थर रोड कारागृहात पाठवले. पण काही काळाने त्याला ताप आला व छातीतही दुखू लागले. सकाळी पुन्हा त्याला जे.जे. रुग्णालयात दाखल केले. या वेळी उपचारादरम्यान हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुपारी २.३०च्या सुमारास डोसाचा मृत्यू झाला, अशी माहिती जे.जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. तात्याराव लहाने यांनी दिली.
१९९३ बॉम्बस्फोटांतील डोसाची भूमिका-
मुंबईमध्ये १२ मार्च १९९३ रोजी झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांत २५७ जणांचा मृत्यू झाला तर ७००हून अधिक लोक गंभीररीत्या जखमी झाले. सलीम शेख उर्फ सलीम कुत्ता याने १९९५ साली दिलेल्या जबाबावरून मुस्तफा डोसाला या स्फोटाचा आरोपी करण्यात आले.
त्याला दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळावरून २० मार्च २००३ रोजी अटक करण्यात आली. मात्र डोसाने आपण निर्दोष असून ते सिद्ध करण्यासाठी स्वत:हून पोलिसांना शरण आल्याचा दावा न्यायालयापुढे केला होता.