‘त्या’ कार्यकर्त्याचे मूक उपोषण
By admin | Published: June 7, 2017 04:12 AM2017-06-07T04:12:15+5:302017-06-07T04:12:15+5:30
माहिती चळवळीतील (आरटीआय) कार्यकर्ते महेश निंबाळकर यांच्यावर मार्चमध्ये जीवघेणा हल्ला झाला होता.
लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली : माहिती चळवळीतील (आरटीआय) कार्यकर्ते महेश निंबाळकर यांच्यावर मार्चमध्ये जीवघेणा हल्ला झाला होता. रामनगर पोलिसांनी दोन महिन्यांत त्याचा कोणताच तपास न केल्याच्या निषेधार्थ निंबाळकर यांनी कुटुंबीयांसह मंगळवारी सकाळपासून पोलीस ठाण्याबाहेर मूक उपोषण केले.
मानपाडा रोडवरील एका प्रार्थनास्थळाच्या बांधकामाबाबत निंबाळकर यांनी माहिती अधिकाराच्या कायद्याचा वापर करत माहिती मागितली होती. या कारणावरूनच मला २३ मार्चला भरदिवसा मारहाण झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
निंबाळकर हे त्यांच्या मानपाडा रोडवरील टॅ्रव्हल्सच्या कार्यालयात बसले असताना काही तरुणांनी येऊन त्यांच्यावर हल्ला के ला. त्यात त्यांच्या डोक्यातून रक्तस्त्राव झाला. तसेच पायही फ्रॅक्चर झाले.
दोन महिने होऊनही आरोपींवर कडक कारवाई न झाल्याने त्यांनी मंगळवारी सकाळी ११.३० च्या सुमारास रामनगर पोलीस ठाण्याबाहेर रुग्णवाहिकेतून येऊन तेथे कुटुंबीयांसह मूक उपोषण सुरू केले.
याबाबत रामनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयसिंग पवार म्हणाले की, निंबाळकर यांनी उपोषण केले नाही. ते भेटीसाठी आले होते. भेटीनंतर त्यांचे समाधान झाल्याने ते घरी निघून गेले.
जवळजवळ तीन तास मी, माझी आई व माझ्या कुटुंबासोबत रामनगर पोलीस ठाण्याबाहेर मूक उपोषण केले. त्यानंतर पवार यांच्याशी बोलणी केली. त्यांनी योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिल्याने मी उपोषण मागे घेऊन घरी गेलो. - महेश निंबाळकर, आरटीआय कायकर्ते