Mutha canal : रहिवासी म्हणतात उंदीर घुशी नाही तर 'या' कारणामुळे फुटला मुठा कालवा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2018 08:45 PM2018-09-27T20:45:05+5:302018-09-27T21:00:04+5:30
गुरुवारी सकाळी सव्वा अकराच्या सुमारास शहरातील दांडेकर पुलाजवळ कालवा फुटून झालेल्या मोठ्या नुकसानामागे संरक्षक भिंतीत टाकण्यात आलेल्या केबल जबाबदार असल्याचा नवा मुद्दा समोर येत आहे.
पुणे : गुरुवारी सकाळी सव्वा अकराच्या सुमारास शहरातील दांडेकर पुलाजवळ कालवा फुटून झालेल्या मोठ्या नुकसानामागे संरक्षक भिंतीत टाकण्यात आलेल्या केबल जबाबदार असल्याचा नवा मुद्दा समोर येत आहे. त्यामुळे महापालिकेचे दुर्लक्ष, पाटबंधारे विभागाचा बेजबाबदारपणा यांच्यासोबत कालव्याची भिंतींमध्ये टाकण्यात आलेल्या केबल जबाबदार असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील दांडेकर पूल, सिंहगड रस्ता भागात मुठा कालवा फुटून ३०० पेक्षा अधिक झोपड्यांमध्ये पाणी शिरले. या पाण्यात स्थानिकांचे संसार वाहून गेले आहेत. यात अनेकांनी आयुष्यभर महत प्रयत्नाने गोळा केलेल्या पुंजीलाही तिलांजली मिळाली. त्यामुळे सर्वस्व हरवून बसलेल्या नागरिकांच्या डोळ्यातले पाणी आटायला तयार नाही.
या आपत्तीमागे कालव्याला गळती होत असूनही महापालिकेचे दुर्लक्ष आणि पाटबंधारे विभागाचा अक्षम्य बेजाबदारपणा यामुळे त्रास मात्र निष्पाप नागरिकांना भोगावा लागत आहे. यापैकीच एक कारण म्हणजे ज्या ठिकाणी कालव्याला भगदाड पडले त्या ठिकाणी मातीच्या भिंतीत एक- दोन नव्हे तर तब्बल सहा केबल टाकण्यात आल्या आहेत. यातील दोन खासगी कंपनीच्या आहेत. गंभीर बाब म्हणजे कालव्याची भिंत खोदून या केबल टाकल्याचे दिसून आले. कालव्याच्या पाण्यापासून तीन ते पाच फुटावर ही केबल आहे. त्यामुळे केबल टाकण्यासाठी भिंत खोदण्यात आली आणि त्यामुळे ही घटना घडल्याचा संशय स्थानिकांनी व्यक्त केला आहे.