२४ ऑगस्टला 'महाराष्ट्र बंद'ची हाक; महिला सुरक्षेच्या मुद्द्यांवरून मविआ आक्रमक

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2024 01:58 PM2024-08-21T13:58:06+5:302024-08-21T17:13:52+5:30

बदलापूर अत्याचार घटनेच्या निषेधार्थ मविआकडून २४ ऑगस्टला महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे.

MVA calls for Maharashtra bandh on 24th August to protest the Badlapur atrocities | २४ ऑगस्टला 'महाराष्ट्र बंद'ची हाक; महिला सुरक्षेच्या मुद्द्यांवरून मविआ आक्रमक

२४ ऑगस्टला 'महाराष्ट्र बंद'ची हाक; महिला सुरक्षेच्या मुद्द्यांवरून मविआ आक्रमक

Badlapur School Crime : बदलापूरमधील एका नामांकित शाळेतील तीन वर्षांच्या दोन चिमुकल्या मुलींवर शाळेतल्याच कार्मचाऱ्यानं बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. याचाच प्रत्यय सोमवारी बदलापुरात आला. या घटनेच्या निषेधार्थ बदलापूरकर रस्त्यावर उतरले होते. तब्बल १० तास बदलापूरकरांनी मध्य रेल्वेची वाहतूक रोखून धरली होती. वारंवार प्रयत्न करुनही सरकारला त्यांची समजूत काढता आली नाही. शेवटी लाठीचार्ज करत आंदोलकांना बाजूला करण्यात आला. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया देताना हे आंदोलन राजकीय प्रेरित होतं असं म्हटलं आहे. याच पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीने अत्याचारांच्या घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे.

बदलापूरमध्ये दोन चिमुकल्या मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेनं नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. आठवड्याभरानंतर हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर बदलापूरमधील नागरिकांनी सोमवारी मोठ्या प्रमाणात रोष व्यक्त केला. या घटनेच्या निषेशासाठी मोठ्या प्रमाणात लोक रस्त्यावर उतरले होते. काही पालकांनी जिथे ही घटना घडली त्या शाळेची तोडफोड केली. तर दुसरीकडे बदलापूर स्थानकात नागरिक १० तास ठिय्या मांडून बसले होते. आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी आंदोलनकांनी केली. त्यानंतर पोलिसांनी बळाचा वापर करत आंदोलनकांना तिथून हुसकावून लावलं. या घटनेविषयी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे आंदोलन राजकारणाने प्रेरित होते असं म्हटलं आहे. या घटनेच्या निषेधार्थ आता महाविकास आघाडीने महाराष्ट्र बंदची घोषणा दिली आहे.

"महाराष्ट्रातील परिस्थितीनुसार राज्यातील मुलीसुद्धा सुरक्षित नाहीत. या घटनेला दाबण्यासाठी सरकारने प्रयत्न केले. शाळेची संस्था भाजप आणि आरएसएसची असल्यामुळे त्यांची बदनामी होऊ नये म्हणून काळजी घेतली गेली. महिला पत्रकाराला महायुतीच्या पदाधिकाऱ्याने अपशब्द वापरले. आम्हाला यात राजकारण करायचं नाही. रोज महाराष्ट्राला काळिमा लावण्याचा प्रयत्न केला जातोय. त्यामुळे येत्या २४ तारखेला महाराष्ट्र बंदची हाक आम्ही दिलेली आहे. त्यामध्ये महाविकास आघाडीचे सगळे सहभागी होणार आहेत. यामाध्यमातून अकार्यक्ष सरकारला  आरसा दाखवण्याचे काम जनता करेल," असं नाना पटोले म्हणाले.

बदलापूरच्या आंदोलनावरुन मुख्यमंत्र्यांचा आरोप

"कालचे जे आंदोलन होते, ते राजकारणाने प्रेरित होते, असे माझे म्हणणे आहे. कारण एवढ्या लवकर जेव्हा आंदोलन होते, त्यात स्थानिक लोक असतात. येथे स्थानिक लोक हाताच्या बोटावर मोजण्या एवढे होते आणि इतर ठिकाणावरून गाड्या भरून भरून त्या ठिकाणी आंदोलक आले होते. मंत्री महोदयांनी त्यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या तरीही ते हाटायला तयार नव्हते. याचा अर्थ त्यांना सरकारची बदनामी करायची होती," असा आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला.

दरम्यान, बदलापुरातील चिमुकल्यांवर अत्याचार करणाऱ्या अक्षय शिंदे या मुख्य आरोपीला आज कल्याण कोर्टात हजर करण्यात आलं. कोर्टानं त्याला पुन्हा २६ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलीये. बदलापुरातील नामांकीत शाळेतील दोन चिमुकल्यांवर अक्षयनं लैंगिक अत्याचार केल्याचं उघड झालंय. 

Web Title: MVA calls for Maharashtra bandh on 24th August to protest the Badlapur atrocities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.